पुणे : सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, आर्टी या सर्व संस्थांकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, संपूर्ण निवड प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करावी, प्रत्येक संस्थेची स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करून सरसकट फेलोशिप लागू करावी, या मागण्यांसाठी संशोधक विद्यार्थ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे.
शनिवारी (दि. २०) सहावा दिवस उजाडला तरी सरकारकडून ना अधिकाऱ्यांनी दखल घेतली, ना मंत्र्यांनी. या दिरंगाईत काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून, सरकार आता आमचा जीव घेणार आहे का, असा संतप्त सवाल आंदोलकांकडून केला जात आहे.
डेक्कन येथील गुडलक चौकात कलाकार कट्टयावर सुरू असलेल्या या आंदोलनास भेट देत शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी चर्चा केली. सपकाळ यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून आंदोलकांचे प्रश्न सांगितले. शेट्टी यांनीही सामाजिक न्याय मंत्र्यांना फोन करत विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेण्याची विनंती केली. यापूर्वीही वंचितचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे मोहन जोशी यांनीही सरकारने तातडीने लक्ष द्यावे, असे आवाहन केले.