राजगड : राजगड आणि तोरणा किल्ल्यांच्या दाट जंगलात प्रथमच दुर्मीळ चौसिंगा जातीच्या हरणांचे वास्तव्य असल्याचे वन विभागाच्या तपासात उघड झाले आहे. वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथील एका गोठ्यात चौसिंगा हरणाची दोन पाडसे आढळून आली असून, राजगड वन विभागाने त्यांना जीवदान दिले आहे.शनिवारी (दि. २७ सप्टेंबर २०२५) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कैलास बोराणे यांच्या गोठ्यात गायी-वासरांसोबत जंगलातून दोन पाडसे आली. स्थानिक रहिवासी किशोर कोळपे, प्रसाद सांगळे, मंगेश पवार, सचिन गायखे, रामभाऊ राजिवडे आणि विनोद दिघे यांनी पाडसांच्या मातेचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. ही पाडसे दीड ते दोन महिन्यांची असल्याचा अंदाज आहे. राजगड तालुका वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, वनपरिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे आणि वनरक्षक शुभांगी जगताप यांनी तातडीने पाडसांची काळजी घेतली. पाऊस आणि थंडीमुळे गारठलेल्या या पाडसांना वाचवण्यासाठी बावधन येथील प्राणी उपचार केंद्राशी संपर्क साधून रात्री उशिरा त्यांना तिथे हलवण्यात आले.
वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे म्हणाले, ‘राजगड, तोरणा, पानशेत आणि रायगड जिल्ह्यांच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर चौसिंगा जातीचे हरिण अत्यंत दुर्मीळ आहे. या पाडसांच्या आढळण्याने या परिसरात प्रथमच या जातीच्या हरणांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन विभाग चौसिंगा हरणांसह इतर दुर्मीळ प्राण्यांचा अधिवास सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार आहे. ही घटना स्थानिक वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वन विभागाच्या या तत्परतेमुळे दोन पाडसांचे प्राण वाचले असून, परिसरातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पुढील पावले उचलली जाणार आहेत’.
Web Summary : First sighting of rare four-horned antelope in Rajgad forest. Two fawns found near Velhe were rescued by the forest department and taken to a treatment center.
Web Summary : राजगढ़ के जंगल में पहली बार दुर्लभ चौसिंघा हिरण देखे गए। वेल्हे के पास मिले दो शावकों को वन विभाग ने बचाया और उपचार केंद्र भेजा।