पुणे : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. असे असताना बिलासपूर विभागात कनेक्टिव्हिटीच्या कामामुळे पुणे विभागातील पुणे-हावडा-पुणे आणि पुणे-संत्रागाची-पुणे एक्स्प्रेस काही दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास दहा ते बारा दिवस या एक्स्प्रेस गाड्या बंद असल्यामुळे या दरम्यान बुकिंग केलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
बिलासपूर विभागातील रायगड-झारसुगुडा जंक्शनमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या विद्युतीकृत विभागावरील कोटारलिया स्टेशनवरील चौथ्या मार्गावरील कनेक्टिव्हिटीचे काम सुरू करण्यात येणार आहे. दि. ११ ते २३ एप्रिलदरम्यान हे काम चालणार आहे.
हे काम ऐन उन्हाळ्यात आणि प्रवासी हंगाम सुरू होताना काढण्यात आले. त्याचा परिणाम काही रेल्वे गाड्यांवर झाला असून, महत्त्वाच्या एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वेळांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
संत्रागाची-पुणे एक्स्प्रेस - दि. १२ आणि १९ एप्रिल रद्द
पुणे-संत्रागाची एक्स्प्रेस - दि. १४ आणि २१ एप्रिल रद्द
पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस - दि. ११ ते २४ एप्रिलपर्यंत रद्द
हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस - दि. ११ ते २४ एप्रिलपर्यंत रद्द
हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस - दि. १०, १२, १७ आणि १९ एप्रिल रोजी रद्द
पुणे-हावडा दुरांतो एक्स्प्रेस - दि. १२, १४, १९ आणि २१ एप्रिल रोजी रद्द