पुणे : महापालिका निवडणुकीच्या आगामी रणसंग्रामात उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांकडून सध्या शहरात जनसंपर्क सेवा अभियान आणि जनसंवाद यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यानिमित्ताने इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी करत प्रसिद्धी मिळवण्यासोबतच नेत्यांवर छाप पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र सिंहगड रस्ता परिसरात पहायला मिळत आहे. यामुळे सिंहगड रस्ता परिसरात अनधिकृत फ्लेक्सचे पेव फुटले आहे.
मागील तीन ते साडेतीन वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकांचा कारभार प्रशासनाच्या माध्यमातून चालविला जात आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यामुळे राजकीय पक्ष आणि इच्छुकांकडूनही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या अनिश्चिततेमुळे खर्च टाळण्यासाठी मागील दोन-अडीच वर्षे फ्लेक्स व सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणारे सर्वपक्षीय इच्छुक आता पुढील काही महिन्यांत निवडणूक होणार असल्याने अॅक्टिव्ह मोडवर आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय इच्छुकांकडून छोटी-मोठी कारणे शोधली जात आहेत. या निमित्ताने फ्लेक्स व इतर माध्यमातून प्रसिद्धीची संधी साधली जात आहे. मतदारांसह उमेदवारी देण्याच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आपल्या नेत्यावर छाप पाडण्यासाठी आणि उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी नाना प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. असेच चित्र सध्या सिंहगड रस्ता परिसरात पहायला मिळत आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली आहे. दोन्ही नेत्यांची उमेदवारी वाटपातील भूमिका लक्षात घेऊन त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स जागा मिळेल तिथे उभारण्यात आले आहेत.नेत्यांनी फ्लेक्सबाबत व्यक्त केली होती नाराजीअनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होते, पदपथावर व रस्त्यांच्या कडेला उभारलेल्या फ्लेक्समुळे नागरिकांना व वाहनांना अडथळा निर्माण होतो, त्यामुळे रोष पत्कारावा लागतो, या पार्श्वभूमीवर अजित पवार व मुरलीधर मोहोळ या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी फ्लेक्सबाजीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच अनधिकृत फ्लेक्स न उभारण्याचे आवाहन केले होते.
नेत्यांच्या संवाद यात्रा...केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी सिंहगड रस्ता भागात खासदार जनसंपर्क सेवा अभियान, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३ ऑक्टो रोजी वडगाव परिसरात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
Web Summary : Ahead of elections, Pune's Sinhagad Road sees a rise in unauthorized flex banners by political aspirants trying to impress leaders. Despite leaders' disapproval, banners promoting events are prevalent.
Web Summary : चुनाव से पहले, पुणे के सिंहगढ़ रोड पर नेताओं को प्रभावित करने की कोशिश में राजनीतिक उम्मीदवारों द्वारा अनधिकृत फ्लेक्स बैनर की बाढ़ आ गई है। नेताओं की अस्वीकृति के बावजूद, कार्यक्रमों को बढ़ावा देने वाले बैनर प्रमुख हैं।