पुणे : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विविध रस्त्यांवरील मिसिंग लिंक जोडण्यासाठी महापालिकेला राज्य सरकारची मदत मिळणार आहे. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या पथ विभागाने पाच मिसिंग लिंक जोडण्यासाठी लागणाऱ्या १०० कोटींच्या निधीचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाला वर्षभरापूर्वी पाठवला आहे. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे मिसिंग लिंक जोडण्याच्या कामाला खीळ बसली आहे.
शहराचा आकार, लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन महापालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना व सेवासुविधा पुरविल्या जातात. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य शहरासह उपनगरांमध्ये उड्डाणपूल, ग्रेड सेफरेटर आणि लहान-मोठ्या लांबीचे आणि रुंदीचे रस्ते विकसित केले जातात. मात्र, दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
विकास आराखड्यात (डीपी) दाखवलेल्या रस्त्याची संपूर्ण जागा ताब्यात आली तरच त्या रस्त्याचा पूर्ण वापर करता येतो. अन्यथा लाखो रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता वापराविना पडून राहतो. पुण्यातही डीपीमध्ये समावेश असलेले अनेक रस्ते भूसंपादन आणि इतर कारणांमुळे रखडलेले आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा मिसिंग लिंक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ० ते १०० मीटर अंतरामुळे रखडलेल्या रस्ते जोडण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांची चर्चा करताना मिसिंग लिंकच्या भूसंपादनासाठी शासन १०० कोटींचा निधी देईल. महापालिकेने प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार महापालिकेच्या पथ विभागाने राज्याच्या वित्त (नियोजन) विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना वर्षभरापूर्वी प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे मिसिंग लिंक जोडण्याच्या कामाला खीळ बसली आहे.या मिसिंग लिंकच्या भूसंपादनासाठी पाठवला प्रस्ताव- वारजे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते दुधाने लॉन्स- वारजे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डुक्कर खिंड- खराडी-मुंढवा येथून नदीपात्रातील रस्त्याला जोडणारा रस्ता- मारुती चौक (बाणेर) ते पॅन कार्ड क्लब रस्ता- पाषाण-बाणेर लिंक रोड