- सुरेश वांढेकर
वाघोली : महानगरपालिकेच्या २०२५ ला होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ४१ प्रभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. ही रचना करत असताना केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे पूर्णता दुर्लक्ष करून केवळ भाजपच्या विद्यमान उमेदवारांना सोईची ठरणारी प्रभाग रचना केल्याने ती तत्काळ रद्द करण्यासाठी मागणी वाघोलीकरांच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
काल सायंकाळी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये नैसर्गिक नदी, नाले, मंदिरे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग यांचा हद्द निश्चित करताना विचार केला जावा, अशा स्पष्ट सूचना असतानासुद्धा त्याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केलेले आहे. तसेच सध्या निर्माण केलेल्या रचनेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाशी संबंधित आरक्षण व उमेदवारांवर विपरीत परिणाम करणारी रचना केल्याचे जाणवत आहे.
ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणाव्यतिरिक्त निवडून येणारे प्रमाण घटणार असल्याने त्याबाबतदेखील नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करून महानगरपालिकेने केलेल्या प्रभाग रचनेस तत्काळ स्थगिती द्यावी, अशी विनंती वाघोलीकरांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. ही प्रभाग रचना मतदारांसाठी आणि निवडणून येणाऱ्या उमेदवारांना कामे करण्यासाठी ही रचना सोयीची नसल्याचा आरोप केला आहे.
वाघोलीचे दोन तुकडे झालेले आहेत, हे अयोग्य आहे. आम्ही यावरती हरकती घेऊ. यांची दखल घेतली नाही तर आम्ही न्यायालयात जाणार. - सुनील जाधवराव सर्व राजकीय पुढाऱ्यांनी वाघोली एकसंध ठेवण्यासाठी एकत्र येऊन हरकती नोंदविणे. हरकतीची निवडणूक अधिकारी यांनी दखल घेतली नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार - मीना सातव पाटील