पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी उद्या (मंगळवारी) प्रारूप आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्यानंतरच कोणत्या प्रभागामध्ये कोण उभे राहणार? याचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. आरक्षण सोडतीने काही प्रभागात दिग्गजांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे तर काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातंर्गत संषर्घ करावा लागणार आहे. काही प्रभागांमध्ये दिग्गज माजी नगरसेवकांना एकमेकांसमोर उभे राहवे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षण सोडत अनुकूल व्हावी, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव - कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. १६५ नगरसेवकांच्या जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ८३ नगरसेविका आणि ८२ नगरसेवक असणार आहेत. अनुसूचित जातींसाठी (एससी) २२, तर अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा आरक्षित आहेत. तसेच ओबीसींसाठी ४४ जागा राखीव आहेत. या आरक्षण सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार आधी एसटी, एससी आणि त्यानंतर ओबीसीचे आरक्षण काढले जाणार आहे. तसेच एक आरक्षण असलेल्या ठिकाणी चक्राकार पद्धतीने ते आरक्षण असणार आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गांसाठी आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाते. त्यानंतर कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवार उभा राहणार आहे, कोणी पत्नीला किंवा आईला उभे करणार आहे, एका प्रभागात किती आरक्षण पडणार आहेत? यावरही अनेकांची राजकीय गणिते अवलंबून आहेत. प्रभागातून कोणाला उभे करायचे? याचेही राजकीय डावपेच ठरविले जाणार आहेत.
उमेदवारासाठी पक्षातंर्गतही करावा लागणार संषर्घ
काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक आहे. यामुळे अशा प्रभागांमध्ये अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातंर्गत संषर्घ करावा लागणार आहे. तर काही जणांना पुन्हा महापालिकेच्या सभागृहात जाण्याच्या आपल्या इच्छेवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. उमेदवारी वाटप करताना पक्षश्रेष्ठींसाठी ही मोठी डोकेदुखी वाढणार आहे. यामध्ये नाराजी टाळण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. अंतिम आरक्षण सोडत २ डिसेंबरला
आरक्षणाचे प्रारूप १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. या प्रारूप आरक्षण सोडतीवर १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची अंतिम मुदत आहे. हरकती सूचना महापालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय किंवा पालिकेच्या प्रभाग कार्यालयात नोंदविता येणार आहेत. पालिकेची वेबसाइट, ई-मेल किंवा ऑनलाइन प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. त्यानंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.
राजकीय पक्ष लागले तयारीला
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यानंतर जिल्हापरिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. या निवडणुका झाल्यानंतरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. पालिका निवडणुकासाठी प्रशासनाची आणि राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने कार्यकत्यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या आणि सर्व जागा लढविण्यासाठीची तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस आणि भाजपने या निवडणुकीसाठी संबंधित नेत्यावर जबाबदारी टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रपवार पक्ष, शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटही तयारीला लागले आहेत.
शहरात फ्लेक्स वाॅर सुरू
पुणे महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर माजी नगरसेवकासह इच्छुकांचे विविध उपक्रमाचे फलेक्स झळकू लागले आहेत. आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वीच चौकाचौकांत विविध पक्षांच्या इच्छुकांचे फलेक्स लागल्याने शहरात फ्लेक्स वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे. पालिकेसह विविध कामासाठी मदत हवी असल्यास एक कॉल करा असा मजकूर लिहिला आहे.
पुणे महापालिका एकूण जागा १६५
- अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा
- अनुसूचित जातींसाठी (एससी) २२
- ओबीसींसाठी ४४ जागा
Web Summary : Pune Municipal Corporation elections approach; reservation draw will clarify the political field. Competition expected for candidacy, some veterans may face challenges. Parties prepare.
Web Summary : पुणे महानगरपालिका चुनाव नजदीक; आरक्षण से राजनीतिक मैदान स्पष्ट होगा। उम्मीदवारी के लिए प्रतिस्पर्धा, कुछ दिग्गजों को चुनौती। पार्टियाँ तैयार।