पुणे : टिंगरेनगर परिसरात एकाने फिरस्त्या श्वानावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. होनाप्पा अमोघीसिद्ध होस्मानी (रा. विश्रांतीवाडी) असे त्याचे नाव आहे. याबाबत एका २७ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही टिंगरेनगर येथे राहण्यास आहे. ३ ऑगस्टला दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी तरुणीच्या घराच्या समोर ही घटना घडली.
तरुणीच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये, सार्वजनिक रस्त्यावर, गल्लीमध्ये आरोपीने एका फिरस्त्या श्वानाला वारंवार मारहाण केली तसेच त्या श्वानावर अत्याचार करून छळ केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत आरोपीविरोधात प्राणी क्रूरता अधिनियमांन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.