पुणे : शहराच्या आरोग्य व्यवस्थेतील कमतरता पुन्हा एकदा उघड झाली आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णसेवेला मोठा फटका बसत आहे. महापालिकेची विविध रुग्णालये, दवाखाने व प्रसूतिगृहांमध्ये रोज हजारो रुग्ण उपचारांसाठी गर्दी करत असताना डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी यांच्या अभावामुळे सेवेत अडथळे निर्माण होत आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागात वर्ग १ ते ४ या संवर्गांतील मंजूर १,७८३ पदांपैकी तब्बल ६३५ पदे रिक्त आहेत. सध्या केवळ १,१६० कर्मचारी कार्यरत असून, त्यावर संपूर्ण आरोग्य व्यवस्था चालविली जात आहे. यामध्ये डॉक्टरांच्या १४५ पदांपैकी १०६ पदे रिक्त आहेत. परिणामी केवळ ३९ डॉक्टर व अधिकारी यांच्यावर आरोग्यसेवेची जबाबदारी आहे.
महापालिकेच्या ६० पेक्षा जास्त बाह्यरुग्ण विभागांबरोबरच एक सामान्य रुग्णालय, संसर्गजन्य रुग्णालय व २१ प्रसूतीगृहे कार्यरत आहेत. परंतु मोठ्या प्रमाणावर तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर व कर्मचारी नेमून सेवेत सातत्य ठेवले जात आहे. तरीदेखील वाढत्या साथीचे आजार, मोफत उपचारासाठी येणारी रुग्णांची प्रचंड गर्दी यामुळे उपलब्ध मनुष्यबळ अपुरे ठरत आहे.
कर्मचारी संघटना व सामाजिक संस्थांकडून रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी सतत होत असली तरी भरती प्रक्रियेला वेग मिळत नाही. त्यामुळे रुग्णसेवेतील उणीव अधिक तीव्र होत आहे. नागरिकांची वाढती गर्दी व आरोग्य कर्मचारी कमी असल्याने, महापालिकेच्या दवाखान्यांची अवस्था सध्या अक्षरशः ‘सलाइन’वर असल्याचे चित्र आहे.
संवर्गनिहाय पदांची माहिती
वर्ग - मंजूर पदे - कार्यरत पदे - रिक्त पदे
वर्ग १ - १४५ - ३९ - १०६
वर्ग २ - २६८ - १८३ - ८५
वर्ग ३ - ७५५ - ५३४ - २२१
वर्ग ४ - ६१५ - ४०४ - २२३
-------------
एकूण - १७८३ - ११६० - ६३५----------
पगाराच्या कमतरतेमुळे डॉक्टर सेवा देण्यास येत नाहीत. त्यांचे वेतन ठरविणे हा धोरणात्मक निर्णय आहे. मात्र आता विविध वर्गांमधील रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. काही ठिकाणी मुलाखती, तर काही ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू आहे. - डॉ. निना बोराडे, आरोग्य विभागप्रमुख, पुणे महापालिका.