कोथरूड : स्वामी विवेकानंद चौकातील ‘न्यु गोल्डन बेकरी’ला शुक्रवारी (८ ऑगस्ट) पहाटे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.पहाटे साधारण ४.२५ वाजता लागलेल्या आगीने बेकरीचा मोठा भाग जळून खाक झाला. आगीची माहिती मिळताच कोथरूड, एरंडवणे, वारजे आणि एनडीए येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सलग दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी सहा वाजता आग आटोक्यात आली. बेकरी तळमजल्यावर असून ती विजेवर आणि गॅसवर चालते.आगीच्या वेळी बेकरीतील सात कामगार आणि इमारतीत राहणारे विद्यार्थी वेळेत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाने सहा गॅस सिलेंडर सुरक्षितरीत्या बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना घडली नाही.शेजारील रहिवाशांना तात्पुरते सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून पंचनामा सुरू आहे.
कोथरूडमध्ये न्यु गोल्डन बेकरीला भीषण आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:29 IST