मंचर : मंचर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गाची दुरवस्था झाली असून, या रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्ती करावी, तसेच तो मंचर नगरपंचायतीकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी माजी उपसरपंच सुनील बाणखेले यांनी केली आहे.
खेड-सिन्नर रस्त्यासाठी मंचर शहराच्या दक्षिणेकडून निघोटवाडी गावाजवळून बायपास रस्ता तयार करण्यात आला आहे. हा बायपास भोरवाडी येथून सुरू होऊन एकलहरे हद्दीत प्रवेश करतो. बायपासमुळे जुन्या पुणे-नाशिक महामार्गाकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या देखभालीकडे लक्ष देण्यात आलेले नाही, परिणामी रस्त्यावर खड्डे पडले असून साइड पट्ट्या खचल्या आहेत. गुजराथी हॉस्पिटलसमोर पावसाचे पाणी साचून मोठे खड्डे तयार झाले आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना प्रवासात अडचणी येत आहेत. भोरवाडी ते जीवन हॉटेलसमोरील खिंडीपर्यंतचा रस्ता खराब झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक, विशेषत: एसटी बससेवा, होत असल्याने रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी बाणखेले यांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच, मंचर शहराच्या हद्दीतील हा रस्ता मंचर नगरपंचायतीकडे वर्ग करावा, अशीही त्यांनी मागणी केली आहे.