बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन जागांची निवडणूक पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:48 IST2025-11-28T11:47:45+5:302025-11-28T11:48:16+5:30
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी येथील जिल्हा न्यायालयात तीन याचिका दाखल झाल्या होत्या.

बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन जागांची निवडणूक पुढे ढकलली
बारामती : बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने येथील जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेप्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रभाग १३-ब आणि प्रभाग १७-अ येथील जागांसाठी नव्याने नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली आहेत. त्यामुळे या दोन जागांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या पुढील आदेशानंतर राबवण्यात येणार आहे.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी माहिती दिली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी येथील जिल्हा न्यायालयात तीन याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, प्रभाग क्रमांक १३-ब आणि प्रभाग १७-अ साठी दि. २६ रोजी नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली आहेत. या दोन अर्जांच्या पुढील प्रक्रियेविषयी (छाननी, उमेदवारी मागे घेणे इत्यादी) राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाईल. त्यानुसार या दोन जागांचा उर्वरित निवडणूक कार्यक्रम राबविला जाईल. या दोन जागा वगळून नगराध्यक्ष आणि इतर सर्व जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. दरम्यान, दोन प्रभागांतील दोन जागांची निवडणूक सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, नगराध्यक्ष पद हे जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे या दोन प्रभागांतील मतदारांना केवळ नगराध्यक्षांसाठी मतदान करणे शक्य होईल का, की नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी पुन्हा मतदान करण्याची संधी मिळेल, याबाबत संभ्रम आहे.