पुणे : पुण्यासारख्या सुसंस्कृत आणि विद्येच्या माहेरघरात असलेल्या शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातही काही न्यायाधीशांकडून वकिलांना अपमानास्पद आणि उद्धट वागणूक दिली जात असल्याची खंत वकिलांनी व्यक्त केली आहे. याबाबत काही वकिलांनी पुणे बार असोसिएशनकडे अधिकृत तक्रारीही केल्या असून, परिणामी काही न्यायाधीशांना बदल्यांनाही सामोरे जावे लागले असल्याचे सांगण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी न्यायालयात एका सरकारी वकिलाने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर हा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत संबंधित वकिलाने न्यायाधीश व लिपिकाकडून मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख केल्याने विधी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
पुण्यातही काही खाजगी वकिलांना न्यायाधीशांकडून कोर्टात बोलण्यास संधी न देणे, ‘तुम्हाला कायदा माहिती नाही का?’, ‘आधी नीट अभ्यास करा’ अशा प्रकारचे टोमणे ऐकावे लागतात. ग्रामीण भागातून आलेल्या वकिलांची देहबोली किंवा भाषाशैली थोडी वेगळी असते, त्यावरून त्यांना कोर्टात टार्गेट केले जाते, अशी खंत काही वकिलांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ‘न्यायाधीशांनी वकिलांना पालक म्हणून मार्गदर्शन करायला हवे, मालकासारखी वागणूक नको,’ असे मत वकिलांनी व्यक्त केले आहे.
वकिलांच्या तक्रारीनंतर न्यायाधीशांची बदली झाल्याची चर्चा
न्यायालयात एका न्यायाधीशांकडून पोलिस आणि वकिलांसोबत उघडपणे राग व्यक्त करणे, अपमानास्पद बोलणे असे प्रकार सातत्याने घडत होते. या पार्श्वभूमीवर काही वकिलांनी संबंधित न्यायाधीशांविरोधात तक्रारी केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली, अशी चर्चा न्यायालयात रंगली होती.
न्यायालयात वकिलांचा अपमान होणे ही केवळ व्यक्तिगत वेदना नाही, तर संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या सन्मानावर घाव आहे. न्यायमंदिरात आदराची वागणूक ही ऐच्छिक नाही, ती अपरिहार्य आहे. - ॲड. राकेश सोनार
न्यायाधीशांच्या वर्तणुकीबद्दल पुणे बार असोसिएशनकडे वकिलांच्या खूप तक्रारी येतात. काही वकिलांना तक्रार करताना भीती वाटते की त्याचा निकालावर परिणाम होईल. त्यामुळे अनेकदा वकील मौन बाळगतात. त्यामुळे आमच्याकडे आलेल्या वकिलांच्या तक्रारी आम्ही सामंजस्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. - ॲड. हेमंत झंजाड, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
न्यायाधीशांना एखाद्या वकिलाला काही बोलायचे असेल किंवा समज द्यायची असेल तर त्यांनी संबंधित वकिलाला त्यांच्या चेंबरमध्ये बोलावून सांगायला हवे. - सरकारी वकील