पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील मुलींचा वसतिगृहाचा प्रश्न सुटण्याचे नाव घेत नाही. एकही मुलगी वंचित राहणार नाही, असे एकीकडे सांगायचे आणि दुसरीकडे मुलींना वसतिगृह न देता ‘बॅगा उचला आणि चालत्या व्हा’ म्हणून धमकी द्यायची, असा प्रकार सुरू आहे. शिक्षण शुल्क भरण्याची क्षमता नाही म्हणून एका मुलीने जीव दिला आणि मंत्री महोदयांना जाग आली. इकडे वसतिगृह मिळाले नाही तर शिक्षणाचे काय होईल म्हणून मुलींना अटॅक येत आहे, तरी लक्ष नाही.
राज्यभर पावसाने थैमान घातले आहे. अशातच विद्यापीठ प्रशासनाने काही मुलींना रूम सोडण्याचा तगादा लावला आहे. बाहेर रूम करून राहू शकत नाही. मदत करणारे कोणी ओळखीचं नाही, अशावेळी कुठे जाणार? आता आपल्या पुढील शिक्षणाचं काय? या विचाराने एका मुलीला बुधवारी (दि. २०) सायंकाळी माइल्ड अटॅक आला.
तिला अन्य मुलींनी तत्काळ हेल्थ सेंटरमध्ये दाखल केले, त्याचबरोबर धीर दिला. अन्यथा...? प्रशासनाला आता तरी जाग येणार का?, अनुचित प्रकार घडून गेल्यानंतर जागे होण्यापेक्षा काही घडू नये म्हणून प्रयत्न करणार आहोत का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यापीठ प्रशासन अर्थात कुलगुरू आणि उच्च व तंत्र शिक्षक मंत्री यांनी स्वतः यात लक्ष घालून हा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळावा, अशी अपेक्षा विद्यार्थिनी व्यक्त करीत आहेत. याबाबत कुलगुरू, प्र. कुलगुरू यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण होऊ शकला नाही.