बारामती : राज्याच्या अर्थसंकल्पात इंदापूर (जि. पुणे) आणि करमाळा (जि. सोलापूर) तालुक्यांना थेट जोडणाऱ्या उजनी धरणाच्या जलाशयावर उभारण्यात येणाऱ्या चांडगाव-पोमलवाडी भव्य पुल प्रकल्पासाठी ३४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या पुलामुळे दोन्ही तालुक्यांमधील दळणवळण सुलभ होणार असून, सुमारे ४० किमी अंतर कमी होऊन वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा, तसेच पर्यटनाला चालना मिळून परिसराच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री तथा इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मंत्री भरणे म्हणाले की, “हा महत्त्वाकांक्षी पूल पूर्ण करण्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी इंदापूरकरांना दिलेले आश्वासन आता प्रत्यक्षात साकार होत आहे. या पुलासाठी भक्कम निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व इंदापूरकरांच्या वतीने आभार मानतो. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे.”
बारामती-लाकडी कळस-लोणी देवकर-चांडगाव रस्ता (प्रजिमा-६५) ते कोर्टी-दिवेगव्हाण-पारेवाडी रेल्वे स्टेशन-केतुर नं.२-पोमलवाडी रस्ता (प्रजिमा-१२४) यांना जोडणाऱ्या या पुलाची प्रस्तावित लांबी सुमारे ८५० मीटर आहे. या महत्त्वाच्या पायाभूत सुविधेसाठी अंदाजे ३४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सध्या इंदापूर आणि करमाळा तालुक्यातील दळणवळणासाठी उजनी धरणाला वळसा घालून भिगवण (ता. इंदापूर) किंवा टेंभुर्णी (ता. माढा) मार्गे जावे लागते. त्यामुळे सुमारे ७० किमीचा प्रवास करावा लागतो. मात्र, लोणी देवकर (पुणे-सोलापूर महामार्ग) ते चांडगाव हे अंतर केवळ ७ किमी असल्याने या पुलामुळे दोन्ही जिल्ह्यांतील संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
या पुलामुळे पोमलवाडी तसेच उजनी धरणकाठच्या गावांतील नागरिकांना व्यापार, शिक्षण आणि वैद्यकीय सेवांसाठी इंदापूर, बारामती, तसेच पुणे येथे येणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच इंदापूर, बारामती, दौंड आणि कर्जत तालुक्यातील साखर कारखान्यांनाही या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे.
यापूर्वी इंदापूर तालुक्यातील कुगाव-शिरसोडी पुलासाठी ३८२ कोटी रुपयांचा प्रस्ताव मार्गी लागला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या अर्थकारणाला मोठे बळ मिळणार आहे. उजनी धरण परिसरातील फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यासही या पुलामुळे चालना मिळून स्थानिक पर्यटन आणि व्यवसायाला नवी संधी निर्माण होणार आहे.
Web Summary : The Chandgaon-Pomalwadi bridge project on Ujani Reservoir receives ₹340 crore, improving connectivity between Indapur and Karmala. The bridge shortens travel by 40km, boosting trade, education, and tourism, according to Minister Dattatraya Bharne. The 850-meter bridge benefits local sugar factories and tourism.
Web Summary : उजनी जलाशय पर चांडगाँव-पोमलवाड़ी पुल परियोजना को ₹340 करोड़ मिले, जिससे इंदापुर और करमाला के बीच कनेक्टिविटी में सुधार होगा। मंत्री दत्तात्रय भरणे के अनुसार, यह पुल 40 किमी की यात्रा को कम करता है, जिससे व्यापार, शिक्षा और पर्यटन को बढ़ावा मिलेगा। 850 मीटर का पुल स्थानीय चीनी मिलों और पर्यटन को लाभ पहुंचाता है।