- अंबादास गवंडी पुणे : उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी एकाच ठिकाणी किमान २५ किंवा त्यापेक्षा जास्त दुचाकी, चारचाकी, रिक्षा, टॅक्सी, बस किंवा ट्रक मालकांनी अर्ज केले असतील, तर त्यांच्या सोयीच्या ठिकाणी किंवा सोसायटीमध्ये संबंधित एजन्सीमार्फत सुविधा द्यावी. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त होम फिटमेंट शुल्क आकारू नये, अशा सूचना राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, राज्यात एचएसआरपी प्लेट बसविण्याचे कामाला अधिक गती देण्यासाठी फिटमेंट सेंटरची संख्या वाढविण्यात यावी, त्याबाबतच्या सूचना सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एजन्सीला द्यावी. तसेच आपल्या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकातर्फे फिटमेंट सेंटर्सची तपासणी करुन त्यास आपल्या स्तरावरून परवानगी देण्यात यावी, अशा सूचनाही परिवहन विभागाने दिल्या.