पुणे : सिगारेट न दिल्याच्या कारणावरून दुकानदाराच्या गळ्याला धारदार हत्यार लावून गल्ल्यातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून नेल्याचा प्रकार उत्तमनगर येथील सरस्वतीनगर येथे घडला. याप्रकरणी चार जणांच्या टोळक्यावर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश कांबळे असे आरोपीचे नाव असून, त्याच्यासह अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोगाराम प्रजापती (३२, सरस्वतीनगर, उत्तमनगर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास जोगाराम प्रजापती हे त्याच्या दुकानात असताना तेथे आरोपी आले. त्यांनी जागाराम यांना सिगारेट मागितली; परंतु सिगारेट न दिल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना दमदाटी केली.
त्यानंतर आरोपींनी जबदरस्तीने दुकानात प्रवेश करत जोगाराम याच्या गळ्यावर धारदार हत्यार ठेवत त्याच्या दुकानातील गल्ल्यातील पाच हजार जबरदस्तीने काढून घेत तेथून पोबारा केला. पुढील तपास उत्तमनगर पोलिस करीत आहे.