राजगुरूनगर : खेड तालुक्यातील कुंडेश्वर-पाईट गावाजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १२ महिलांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ही रक्कम संबंधित वारसांच्या बँक खात्यांवर जमा झाल्याची माहिती खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.
कुंडेश्वर देवस्थानकडे जाताना घडलेल्या या भीषण अपघातात १२ महिलांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. या घटनेनंतर शासनाने तत्काळ मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात आले असून, ही रक्कम त्यांच्या वारसांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे. तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी स्वतः गावकऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात माहिती दिली. यावेळी महसूल नायब तहसीलदार राम बिजे, मंडळ अधिकारी मनीषा सुतार आणि ग्राम महसूल अधिकारी प्रतिभा कसबे यांची उपस्थिती होती.अपघातात जखमी झालेल्यांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी शासनाने घेतली आहे. जखमींवर योग्य आणि परिपूर्ण उपचार व्हावेत यासाठी शासन विशेष लक्ष देत असल्याचे तहसीलदार बेडसे यांनी स्पष्ट केले. शासनाच्या या संवेदनशील आणि कार्यतत्पर भूमिकेवर गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हा अपघात अत्यंत दुर्दैवी असला, तरी शासनाने तत्काळ कार्यवाही करून सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका घेतल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे नागरिकांनी कौतुक केले आहे.