वालचंदनगर : वीर धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. वीर धरणातून ३३ हजार क्युसेक पाणी विसर्ग केल्याने नीरा नदी तुडुंब भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस व महसूल विभागाने अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
निरा नदीमध्ये वीर धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळे नीरा नदी तुडुंब झाली आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू असून, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या विद्युत पंप व केबल्स काढलेल्या आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे पाइप वाहून गेले आहेत.
नीरा नदीला कठडे नसल्याने नदी पात्रात खूप मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने चालवणाऱ्या चालकांना व प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन नीरा नदीवरील छोट्या बंधाऱ्यांना व पुलाला संरक्षक कठडे बसवून घ्यावेत, अशी मागणी नदीकाठच्या नागरिकांमधून होत आहे.