Diwali Festivals 2025 Date: यंदाच्या वर्षी दिवाळी चार दिवसांची असून, ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’... वसूबारस हा दिवाळी सणाचा पहिला दिवस. आकाशकंदील, सडारांगोळी काढत दिवाळीला शुक्रवारी (दि. १७) प्रारंभ होणार आहे. दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी घराघरांत जय्यत तयारी सुरू झाली आहे. दि. २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अमावास्या संपत असली तरीही त्या दिवशी नेहमीप्रमाणे सायंकाळी व प्रदोषकाळात (सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटे या कालावधीत) लक्ष्मीपूजन करावे, असे आवाहन दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे.
वसूबारस | Diwali Vasubaras 2025 Date
वसूबारस ‘गोवत्स द्वादशी’ म्हणूनही ओळखली जाते. वसूबारसेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे पूजन करावे. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात अशावेळेस गाय वासराच्या मूर्तीची देखील पूजा करता येते. ते ही शक्य नसल्यास गाईच्या चित्राची पूजा करता येते. मात्र, अशा वेळेस गोग्रासाकरिता आपल्या भागातील गोशाळेस शक्य ते सहकार्य करावे.
धनत्रयोदशी, यमदीपदान (दि. १८) | Diwali Dhantrayodashi 2025 Date
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने-नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यू म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यू येऊ नये, याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा.
नरक चतुर्दशी (दि. २०) | Diwali Narak Chaturdashi 2025 Date
शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. नरक चतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यू निवारणासाठी यमाची प्रार्थना केली जाते. अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाला १४ नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करण्यास सांगितले आहे.
लक्ष्मीकुबेर पूजन (दि. २१) | Diwali Laxmi Kuber Pujan 2025 Date
व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ मानली जाते. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते. कुबेराच्या पूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात. लक्ष्मीपूजनासाठी दु. ३ ते ४:३०, सायं. ६ ते ८:३०, रात्री १०:३० ते १२ पर्यंतचा मुहूर्त आहे.
बलिप्रतिपदा (दि. २२) | Diwali Balipratipada 2025 Date
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला ‘बलिप्रतिपदा’ असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरू होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरू होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते. वहीपूजन पहाटे ३ ते ६, सकाळी ६:३० ते ९:३०, सकाळी ११ ते १२:३० असा मुहूर्त आहे.
भाऊबीज (यमद्वितीया) (दि. २३ ) | Diwali Bhaubeej 2025 Date
नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र, या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे, असे सांगितले आहे.
Web Summary : Diwali begins with Vasubaras. Lakshmi Pujan is on October 21st, during evening and Pradosh Kaal. Dhanteras is on 18th, Narak Chaturdashi on 20th, Balipratipada on 22nd and Bhaubeej on 23rd. Auspicious timings are provided for various rituals.
Web Summary : दिवाली की शुरुआत वसुबारस से। लक्ष्मी पूजन 21 अक्टूबर को, शाम और प्रदोष काल में। धनतेरस 18 को, नरक चतुर्दशी 20 को, बलिप्रतिपदा 22 को और भाऊबीज 23 को है। विभिन्न अनुष्ठानों के लिए शुभ समय दिया गया है।