जेजुरी :महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावरील पूर्व दिशेला असलेल्या आणि देवसंस्थानकडून भाडेकराराने दिलेल्या ‘पेढा - महाप्रसाद विक्री दुकानाला’ गुरुवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. ही घटना रात्री १०:३० ते ११च्या सुमारास घडली. आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने आणि प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने घडलेल्या घटनेमुळे जेजुरी गडाला कोणताही धोका झाला नाही, तसेच कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, देवसंस्थानच्या वतीने भाडेकराराने दिलेल्या पेढा आणि महाप्रसाद विक्री करणाऱ्या अधिकृत दुकानात कार्यरत असलेल्या कामगाराने दुकान बंद करताना पेटता धूप दुकानातून बाहेर न टाकता खाली टाकला. याच धुपाच्या उष्णतेतून आगीची परिस्थिती निर्माण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
रात्री उशिरा दुकानातून धुराचे लोट येताना देवसंस्थान कर्मचारी यांनी पाहिल्यानंतर, त्यांनी तातडीने जेजुरी नगरपरिषद अग्निशमन विभागाशी संपर्क साधत घटनास्थळी पाचारण केले. अग्निशमन दलाच्या कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या आगीत दुकानातील काही प्रमाणात महाप्रसाद व साहित्याचे नुकसान झाले आहे.