लाखेवाडी : इंदापूर तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजारात पेरूचे दर प्रतिकिलो १५ ते १७ रुपये इतके खाली घसरल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याचे चित्र आहे. विशेषतः तैवान पिंक पेरूच्या बागा मोठ्या प्रमाणात लावणाऱ्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
गेल्या दशकात इंदापूर तालुक्यात पेरू पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये तैवान पिंक या अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणाची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पेरूचे दर ढासळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या बाजारात पेरूची वाढलेली आवक आणि परराज्यातील मोठ्या शहरांमध्ये पावसामुळे मागणी कमी झाल्याने भावात मोठी घसरण झाली आहे.
तैवान पिंक पेरूच्या बागांचा खत, व्यवस्थापन, फळांना प्लास्टिक पिशव्या बसवणे, काढणी आणि फोमचा खर्चही सध्याच्या भावातून भरून निघत नाही. "पेरू हा नाशवंत माल आहे, जास्त दिवस ठेवता येत नाही," असे फिटेवाडी येथील शेतकरी शंकर शेंडगे यांनी सांगितले. भाव घसरणीमुळे अनेक शेतकरी पेरूच्या बागा काढून टाकण्याचा विचार करत आहेत.
काही वाणांना समाधानकारक भाव
तैवान पिंक पेरूच्या भावात घसरण असताना पांढऱ्या पेरूस प्रतिकिलो ३५ रुपये आणि रेड पेरूस ५५ रुपये असा समाधानकारक भाव मिळत आहे. मात्र, इंदापूर तालुक्यात तैवान पिंक पेरूच्या बागांचे प्रमाण जास्त असल्याने बहुतांश शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांचे भवितव्य
पेरू उत्पादक शेतकरी सध्या तोट्यात असून, येणाऱ्या काळात बाजारपेठेतील परिस्थिती सुधारेल का, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासकीय पातळीवर उपाययोजना होणे गरजेचे आहे.