ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर-ओझर-नारायणगाव रस्त्यावर धोलवड रस्त्याजवळ शनिवारी दुपारी सुमारे १ वाजता भीषण अपघात घडला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
रस्त्याच्या साईडपट्टीवर उभे असलेल्या दोन तरुणांना भरधाव वेगाने आलेल्या सुपो मॅक्सिमो (एम. एच. १२ एस. एस. ६९७७) या वाहनाने जोरदार धडक दिली. ही घटना ओतूरहून नारायणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर रमेश डुंबरे यांच्या घरासमोर घडली. या अपघातात किशोर यशवंत कडाळे (रा. वनकुटे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी सांगितले.
या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रशासनाने रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.