Eid 2025 : रमजान महिन्यात ऊद, एक्झॉटिक अत्तरांना पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:56 IST2025-03-26T13:55:24+5:302025-03-26T13:56:13+5:30
मुस्लीम बांधव उपवास (रोजा) करताना आणि नमाज अदा करताना अत्तरांचा वापर करतात.

Eid 2025 : रमजान महिन्यात ऊद, एक्झॉटिक अत्तरांना पसंती
- उजमा शेख
पुणे : रमजान महिन्यात धार्मिक आचरणासोबतच सुगंधी अत्तरांची विशेष मागणी वाढली आहे. मुस्लीम बांधव उपवास (रोजा) करताना आणि नमाज अदा करताना अत्तरांचा वापर करतात. या महिन्यात विशेषतः ऊद, जन्नतुल फिरदौस, अजमल, मजमुआ यांसह एक्झॉटिक अत्तरांना मोठी पसंती मिळते. पारंपरिक ऊदसोबतच मोगरा, गुलाब, चमेली आणि चंदनासारख्या हलक्या, फुलांच्या सुगंधी अत्तरासह एक्झॉटिक अत्तरांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येत आहे.
रमजान महिन्यात नमाज अदा करताना, मशिदींमध्ये जाताना किंवा रोजच्या इबादतीसाठी अत्तरांचा उपयोग करण्यात येतो. ऊद हा पारंपरिक आणि गडद सुगंध असलेला अत्तर असतो, तर जन्नतुल फिरदौस, मजमुआ आणि अजमलसारखी अत्तरे अधिक हलकी आणि गोडसर सुगंध देणारी असतात. त्यामुळे ऊदप्रेमींपेक्षा हलक्या सुगंधांना पसंती देणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक वाढत आहे.
रमजाननिमित्त मोमीनपुरा आणि कॅम्प परिसरातील अत्तर दुकाने गजबजली असून, दुबई येथून आयात केलेल्या अत्तरांना विशेष मागणी आहे. व्यापाऱ्यांच्या मते, रमजान महिना जसजसा पुढे सरकत आहे, तसा बाजारपेठांतील उत्साह वाढत असून, ईदच्या पार्श्वभूमीवर अत्तर विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रमजानच्या पहिल्या आठवड्यात पारंपरिक ऊद आणि चंदनयुक्त अत्तरांना जास्त मागणी असते. मात्र, शेवटच्या दहा दिवसांत आणि ईदच्या पूर्वसंध्येला फुलांच्या सुगंधांनी भरलेल्या एक्झॉटिक अत्तरांची विक्री झपाट्याने वाढते.
हलक्या आणि नैसर्गिक सुगंधांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. यामध्ये मोगरा, गुलाब, चमेली यांचे मिश्रण असलेल्या अत्तरांना विशेष मागणी आहे, तसेच मजमुआ आणि जन्नतुल फिरदौस यांसारखी मिश्रित सुगंध असलेली अत्तरेदेखील लोकप्रिय ठरत आहेत. हे एक्झॉटिक अत्तर १०० ते १५०० रुपयांच्या दरात उपलब्ध आहेत.
रमजान महिन्यात अत्तरांची मागणी नेहमीच वाढते; पण सध्या ग्राहक हलक्या आणि फुलांच्या सुगंधांकडे अधिक आकर्षित होत आहेत. जन्नतुल फिरदौस आणि मजमुआ यांसारखी अत्तरे विशेष लोकप्रिय ठरत आहेत. - उमर सुंडके, अत्तर विक्रेता
पूर्वी केवळ ऊद आणि चंदनासारख्या पारंपरिक अत्तरांना मागणी असायची; पण हल्ली लोक एक्झॉटिक आणि नैसर्गिक मिश्रण असलेल्या सुगंधांची निवड करत आहेत. विशेषतः तरुण पिढीला अजमल आणि यासारखी आधुनिक अत्तरे अधिक आवडतात. - फय्याज कुरेशी, अत्तर विक्रेता