पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी ग्रामस्थांशी आजपासून चर्चा
By नितीन चौधरी | Updated: April 2, 2025 18:36 IST2025-04-02T18:34:38+5:302025-04-02T18:36:25+5:30
पुणे : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन विनातक्रार पार पडावे यासाठी तीन भूसंपादन अधिकारी शेतकरी, तसेच जमीनमालकांशी संवाद साधणार आहेत. प्रकल्पाचे ...

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी ग्रामस्थांशी आजपासून चर्चा
पुणे : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन विनातक्रार पार पडावे यासाठी तीन भूसंपादन अधिकारी शेतकरी, तसेच जमीनमालकांशी संवाद साधणार आहेत. प्रकल्पाचे महत्त्व भूसंपादनाची प्रक्रिया मोबदल्याचे वाटप याबाबत ग्रामस्थांच्या सूचना व तक्रारी याबाबतही अधिकारी शंका, समाधान करणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुधवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी वनपुरी, एखतपूर, उदाची वाडी, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळ, पारगाव या सात गावांमध्ये भूसंपादन होणार आहे. गेल्या महिन्यात राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हा प्रकल्प राबवेल, असे सूचित केले. त्यानंतर आता जिल्हा परिषद स्थानाकडून भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
विमानतळासाठी सात गावांमधून २८३२ हेक्टर जमीन संपादन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आता संयुक्त मोजणीसाठी भूमिअभिलेख विभागाकडे प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे. त्यासाठीची चार कोटी ८६ लाख रुपयांची मोजणी शुल्कही ‘एमआयडीसी’कडून भरण्यात आले आहे. त्यानुसार येत्या ९ एप्रिलपासून जमीन मोजणीला सुरुवात करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केले आहे. परिणामी भूसंपादन प्रक्रियेला गती मिळू लागली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत विविध ठिकाणच्या धरण प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आले होते. त्यासाठी संबंधित प्रकल्पग्रस्तांना सरकारकडून पर्यायी जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, विमानतळाच्या जागेसाठी भूसंपादन केल्यास प्रकल्पग्रस्तांना केवळ पैसे देण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे. त्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जात नाही. त्यामुळे संपादित जागेवर आमचे पुनर्वसन कसे होणार? असा प्रश्न जागामालकांना सतावत आहे. यासंदर्भात सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील मुंजवडी आणि एखतपूर या गावांमध्ये बुधवारी जिल्हा प्रशासनातील अधिकारी शेतकरी, जमीनमालकांशी संवाद साधणार आहेत. त्यामध्ये प्रकल्पासाठी किती जमीन संपादित होणार, प्रकल्पामुळे स्थानिक परिस्थितीत कोणते बदल होणार, मोबादल्याचे स्वरूप, त्याचे नियम यांची माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांनी स्वेच्छेने जमीन दिल्यास त्यांना अधिक मोबदला मिळेल, तर विरोध केल्यास कायदेशीर प्रक्रियेनुसार सक्तीने संपादन केल्यास मोबदल्याची रक्कम कशी असेल, याची माहितीही दिली जाणार आहे.