माळेगाव - माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार ,तसेच उपाध्यक्षपदी संगीता बाळासाहेब कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुकीच्या काळातच कारखान्याचा आगामी अध्यक्ष मीच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे पवार यांची अपेक्षित निवड झाली.अध्यक्षपदाची निवड ठरलेली असल्याने कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.त्याप्रमाणे उपाध्यक्ष पदी कोकरे यांची निवड करण्यात आली.नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनलला २१ पैकी २० जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळाले.त्यानंतर शनिवार( दि.५) रोजी माळेगाव कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा निवड पार पडली.अध्यक्ष,उपाध्यक्षपदाची निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी जाहीर केली होती.त्यानुसार दुपारी ३ वाजता कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार व उपाध्यक्ष पदासाठी पणदरे गटातील संगीता कोकरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांकडून कोणताही अर्ज दाखल न झाल्याने ३.४५ मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी अध्यक्षपदी अजित पवार व उपाध्यक्षपदी पणदरे गटातील संगीता कोकरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
कोकरे या २००२ पासून ते आजपर्यंत कारखान्याच्या संचालक मंडळात आहेत .या अगोदर १९९२ ते २००२ त्यांचे पती बाळासाहेब कोकरे हे संचालक होते.सलग २४ वर्ष संचालकपदी काम केल्यानंतर संगीता कोकरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर पणदरे गटातील कार्यकर्त्यांनी फाटक्यांची प्रचंड आताषबाजी करण्यात आली.तसेच,गुलालाची उधळण करून मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केला.