शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर या वर्दळीच्या राज्य महामार्गावर भोसे (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळच रस्त्याच्या कडेला पडलेले महाकाय भगदाड विद्यार्थ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून साईडपट्टी खचलेली असून आता तेथे खोल दरीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. “एखाद्या मोठ्या अपघाताची प्रशासन वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
भोसे गावातील मुख्य चौकात जिल्हा परिषदेची शाळा असून महामार्गावर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या कडेला चालतात. मात्र, साईडपट्टीच पोखरल्याने विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. संबंधित ठिकाणी ओढ्याचा भाग असल्याने खोल दरी निर्माण झाली आहे. पाय जरा जरी घसरला तरी गंभीर दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासकीय अनास्थेचा कळस म्हणजे, हे धोकादायक भगदाड उघड्यावरच असून त्यावर कोणतीही अधिकृत खबरदारीची उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत तिथे कापडी फेटे बांधून वाहनचालक व पादचाऱ्यांना इशारा दिला आहे. रस्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
प्रशासकीय अनास्थेचे ‘फेटे’
रस्त्याला पडलेले जीवघेणे भगदाड प्रशासनाच्या नजरेस यावे आणि अपघात टळावेत म्हणून स्थानिकांनी कापडी फेटे बांधले आहेत. संबंधित विभागाने उपाययोजना करणे अपेक्षित असताना सर्वसामान्य नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी तात्पुरते उपाय करावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
चिमुकल्यांचा जीव टांगणीला
शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक वर्गातील लहान मुलांची संख्या अधिक आहे. महामार्गावरील सुसाट वाहनांपासून वाचण्यासाठी मुले रस्त्याच्या कडेला होतात; मात्र तिथेच हे भगदाड दबा धरून बसले आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठा अनर्थ घडण्यापूर्वी तातडीने साईडपट्टी बुजवून संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी होत आहे. “रस्त्याची सुरक्षा राखणे हे बांधकाम विभागाचे काम आहे; पण येथे आम्हाला फेटे बांधून लोकांना सावध करावे लागत आहे. रात्री प्रकाशाची सोय नसल्याने अपघाताची शक्यता अधिक आहे. तातडीने हे भगदाड बुजवून संरक्षक भिंत बांधावी,” अशी मागणी ग्रामस्थ मुचकुंद जाधव यांनी केली.
Web Summary : A large pothole near a school on the Chakan-Shikrapur highway poses a danger to students. Locals have put up warnings due to administrative neglect, demanding immediate repairs and a safety wall to prevent accidents.
Web Summary : चाकण-शिक्रापुर राजमार्ग पर एक स्कूल के पास एक बड़ा गड्ढा छात्रों के लिए खतरा है। प्रशासनिक लापरवाही के कारण स्थानीय लोगों ने चेतावनी लगाई है, दुर्घटनाओं को रोकने के लिए तत्काल मरम्मत और एक सुरक्षा दीवार की मांग की है।