पुणे : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या शहर शाखेने निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांकडे काही आक्षेप नोंदवले आहेत. उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यांना लेखी पत्र देत पक्षाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा लेखी खुलासा करण्याची मागणी केली.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश खजिनदार ॲड. अभय छाजेड तसेच कमल व्यवहारे, अजित दरेकर, रफिक शेख, मेहबुब नदाफ, सुजित यादव, प्राची दुधाने यांच्या शिष्टमंडळाने कळसकर यांची भेट घेतली व त्यांच्याकडे पक्षाचे लेखी आक्षेप असणारे निवेदन दिले. त्यानुसार पक्षाने महापालिका हद्दीतील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये काम करणाऱ्या बीएलओ (बूथ लेवल ऑफिसर) कर्मचाऱ्यांची नावांसंह यादी मागवली आहे.
महापालिका निवडणुकीत वापरण्यात येणारी मतदार यादी कधी प्रसिद्ध करणार? कोणत्या तारखेपर्यंतची यादी ग्राह्य धरणार?, यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात नव्याने नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे? दुबार नावे जिल्हाधिकारी कार्यालयच वगळणार आहे का? अशी वगळलेली नावे पुन्हा दाखल करण्याची पद्धत काय असेल? मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती कळवावी अशी मागण्याही पक्षाने केल्या आहेत.
पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये आयोगाकडून मतांची चोरी झाल्याचा आरोप केल्यापासून काँग्रेस कार्यकर्ते मतदार याद्यांबाबत बरेच आक्रमक झाले आहेत. मतदार यादीचे सखोल परीक्षण करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेबद्दलही शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळेच शहर शाखेने महापालिका निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या मतदार यादीबाबत आधीच काळजी घेण्याची भूमिका घेतली आहे.