पुणे : पेठांमधील वाहतूककोंडीला फाटा देण्यासाठी वाहन चालकांकडून नदीपात्रातील रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी कार व इतर वाहने अवैधपणे पार्किंग केली जातात. त्यामुळे या रस्त्यावरही शहरातील इतर रस्त्याप्रमाणे वाहतूककोंडी होत आहे.
महापालिकेने एरंडवणा येथील रजपूत झोपडपट्टी ते महापालिका भवनाजवळील जयंतराव टिळक पूल यादरम्यान नदीपात्रातून रस्ता तयार केला आहे. पेठा व शिवाजीनगर, डेक्कन परिसरातील वाहतूककोंडी, विविध चौकांमधील सिग्नल याला फाटा देण्यासाठी कार व दुचाकी चालकांकडून मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर केला जातो. नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जातो. तेव्हा याचा परिणाम संपूर्ण शहरातील वाहतुकीवर होतो व सर्वत्र वाहतूककोंडी होते. त्यामुळे हा रस्ता शहराच्या वाहतुकीवर परिणाम करणारा आहे.
नदीपात्रातील रस्त्यावरील बाबा भिडे पूल सध्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे सध्या नदीपात्रातील रस्ता रजपूत झोपडपट्टी ते डेक्कन आणि नारायण पेठ ते टिळक पूल असा दोन टप्प्यांत वापरला जातो. मात्र, नदीपात्रातील या रस्त्यावर दुतर्फा चारचाकी वाहने, टेम्पो, बस अवैधपणे पार्किंग केल्या जातात. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बाबा भिडे पुलापासून ओंकारेश्वर मंदिरामागील धोबी घाटापर्यंत रस्ता रुंद असल्याने या पार्किंगचा फारसा परिणाम वाहतुकीवर होत नाही. मात्र, ओंकारेश्वर घाटापासून पुढे टिळक पुलापर्यंत म्हणजे अमृतेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याची रुंदी कमी आहे, असे असतानाही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कार व टेम्पो पार्किंग केले जातात. यामुळे नाना-नानी पार्कच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यातच अमृतेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस जिथे टिळक पुलाचे टोक आहे, तेथेच अनेक कार महिनोन महिने धूळ खात उभ्या आहेत. याच ठिकाणी महापालिकेकडून, नदीपात्रातून व शनिवार वाड्याकडून वाहने एकत्र येतात. या धूळ खात उभ्या असलेल्या गाड्यांचा अडथळा निर्माण होऊन या ठिकाणी वारंवार वाहतूककोंडी होते.
म्हणून नदीपात्रातील रस्त्यावर वाहने पार्किंग होतात
शनिवार वाडी, विविध गणेश मंदिरे, बाजारपेठ, मंडई या बाबींचा विचार करून महापालिकेच्या वतीने मध्य शहरात विविध ठिकाणी सशुल्क वाहनतळांची व्यवस्था केलेली आहे. मात्र, पैसे वाचवण्यासाठी आणि रस्त्यांवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी नदीपात्रात वाहने लावण्यास नागरिकांकडून प्राधान्य दिले जाते. शिवाय, पेठांमध्ये राहणाऱ्या अनेकांकडे पार्किंगची व्यवस्था नाही. मात्र, कार घेतलेल्या आहेत. असे लोक आपली वाहने नदीपात्रातील रस्त्यालगत लावतात.