पुणे : बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. शनिवार सुटीचा दिवस असल्याने गणपती सजावटीचे साहित्य, गणपती बाप्पांची मूर्ती व साहित्य घेण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. याशिवाय शहरातील विविध रस्त्यांवर गणपती मंडळांचे स्टेज, कमानी उभारण्याचे काम सुरू असल्याने शनिवारी दिवसभर मोठी वाहतूक कोंडी शहरात दिसून आली.
वाहतूक शाखेकडून पोलिस कर्मचाऱ्यांसह ट्राफिक वॉर्डन चौकाचौकात नियुक्त करण्यात आले होते. मात्र, पावसाच्या शक्यतेमुळे अनेकांनी चारचाकी वाहनांना प्राधान्य दिल्याने वाहतूक कोंडीत आणखीन भर पडली होती. शहराच्या मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, तुळशीबाग परिसर, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, नदीपात्रातील रस्ता, सिंहगड रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, नगर रस्ता येथे दिवसभर वाहनांचा ओघ सुरू असल्याने दुपारनंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
त्यातच विविध ठिकाणी वाहनचालकांकडून दुहेरी पार्किंग, तसेच रस्त्यावर फुटपाथ व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक अधिकच ठप्प झाल्याचे दिसून आले. कर्ते रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता यासह स्वारगेट, डेक्कन, जिल्हा परिषद चौक, टिळक रस्ता, नगर रस्ता या प्रमुख मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.