पुणे : महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामधील १६ चितळ हरणांचा मृत्यू लाळ खुरकत या विषाणूजन्य आजाराने झाल्याचे न्यायवैद्यकीय परीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. प्राणिसंग्रहालयातील बाधित प्राण्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये शंभरहून अधिक हरण आहेत. पंधरा दिवसांपूर्वी आठवडाभरात सलग एक-दोन हरणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सुमारे चितळ प्रकारातील १६ हरणे दगावली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरणे दगावल्याने प्राणिसंग्रहालय प्रशासनने मृत हरणांचे शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या पशुरोगतज्ज्ञांनी केले होते. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी संकलित मृत हरणांचे जैविक राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र, भुवनेश्वर, ओडिशा, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेली, विभागीय, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नागपूर, राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोगशाळा, भोपाळ येथे तपासणीसाठी पाठविले होते.
पाठविलेल्या जैविक नमुन्यांपैकी प्राण्यांचे लक्षणे व प्रयोगशाळा, भुवनेश्वर तसेच राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्राकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांना लाळ खुरकत या विषाणूजन्य आजाराचे संक्रमण होते.
या अहवालानंतर परिणामकारक साथरोग व्यवस्थापन करण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) प्राणिसंग्रहालयासाठी स्थापन करण्यात आलेल्या वन्यप्राणी आरोग्य सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला क्रांतिसिंह नाना पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विकास वासकर, शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विश्वासराव साळुंखे, विकृती शास्त्र विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर मोटे, परजीवी शास्त्रविभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पवार, औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. आंबोरे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. दुष्यंत मुगळीकर, निमंत्रित सदस्य सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. जी. एम. हुलसुरे उपस्थित होते.
वेळीच उपाययोजनांमुळे मृत्यू नियंत्रणात -
लाळ खुरकत हा विषाणू संसर्ग असून, यामुळे प्राण्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. प्राण्यांची स्ट्रेस पातळी वाढते. त्यामुळे प्राणी मृत्युमुखी पडतात. त्यामुळे योग्यवेळी कार्यवाही केल्याने अन्य प्राण्यांचे मृत्यू नियंत्रणात आणण्यास यश मिळाले. सद्य:स्थितीत परिस्थिती नियंत्रणात असून, बाधित प्राण्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे उद्यान अधिकाऱ्यांनी सांगितले.