पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मुठा नदीवरील भिडे पूल गणेशोत्सवापूर्वी म्हणजे २७ ऑगस्टपूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
भिडे पूल मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामासाठी एप्रिलपासून बंद आहे. हे काम जून महिन्यात पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन होते. मात्र, महामेट्रोने यासाठी पालिकेकडे मुदतवाढ मागितली होती. भिडे पूल बंद असल्याने शनिवार पेठ, टिळक रोड, मंडई परिसरातून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा फेरा मारावा लागत आहे.
परिणामी, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यातच, गणेशोत्सवात अनेक प्रमुख रस्त्यांवर मंडळाचे मांडव असल्याने गर्दीमुळे रस्ते बंद करावे लागतात. परिणामी शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते, अशा वेळी हा पूल छोट्या वाहनांसाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे शहरातील गणेश मंडळांकडूनही हा पूल उत्सवापूर्वी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत पूल गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे आश्वासन नवल किशोर राम यांनी दिले.