यवत : दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी (दि. २१) झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडवून दिली होती. सदर घटनेनंतर तब्बल ३६ तासांनी गुन्हा दाखल झाला होता. यानंतर आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्यासह गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि रघुनाथ आव्हाड या चौघांना पोलिसांनी अटक केली होती.
अटक करण्यात आलेल्या चौघांना दौंड न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. २८) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. सोमवारी (दि. २८) पोलिस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चारही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, अद्याप त्यांचा जामीन मंजूर करण्यात आलेला नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.
गोळीबार प्रकरणातील आरोपी हे राजकीय पार्श्वभूमी असलेले व मुळशी तालुक्यातील गडगंज श्रीमंत घराण्याशी संबंधित असल्याने, त्यांचा जामीन मंजूर होतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र, सध्या तरी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून, पुढील सुनावणीची प्रतीक्षा लागली आहे. घटनास्थळी जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा अहवाल व साक्षीदारांचे जबाब हे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.