पुणे - शहरातील लोकप्रिय गुडलक कॅफे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी प्रसिद्धीचे कारण त्यांच्या इराणी चहा आणि बन मस्कासाठी नव्हे, तर बन मस्कामध्ये आढळलेला काचेचा तुकडा हे आहे. या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, या घटनेचा अनुभव घेतलेल्या एका ग्राहकाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला. व्हिडिओत त्या ग्राहकाने स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी कॅफेमध्ये चहा आणि बन मस्का मागवला होता. मात्र, बन खाताना त्यांना त्यामध्ये काचेचा तुकडा आढळून आला. ही बाब अत्यंत गंभीर असून, अशा निष्काळजीपणामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.दरम्यान, या प्रकाराबाबत गुडलक कॅफेच्या व्यवस्थापनाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, हा प्रकार कसा घडला यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर गुडलक कॅफेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून, ग्राहकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाकडूनही याबाबत कारवाई होण्याची मागणी होत आहे.