पुणे : राज्यात सलग दुसऱ्या वर्षीही गोवंशीय लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा लागण कमी आहे. तसेच, लसीकरणामुळे जनावरांमधील मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात आतापर्यंत २५ जिल्ह्यांमध्ये ९ हजार ८२० जनावरे या रोगाला बळी पडले असून, ३३९ जनावरांचा मृत्यू झाला आहे.रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी सुमारे ९३ टक्के जनावरांना लस देण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.पशुसंवर्धन विभागाने या रोगाला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरणासाठी १ कोटी १९ लाख लस मात्रा व अनुषंगिक साहित्याचा पुरवठा पावसाळा सुरू होण्यापूर्वी केला आहे. तसेच, रोगाबाबत पशुपालक, तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
राज्यात लसीकरणासाठी शेळीतील देवीची अर्थात गोट पॉक्सची लस दिली जात असून, त्याचा परिणाम होऊन सध्या राज्यातील एकूण गोवंशीय पशुधनाच्या तुलनेत लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प आहे. राज्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण पूर्ण झाले असून, प्रादुर्भावग्रस्त भागात उपचार, कीटक नियंत्रण व जनजागृती मोहीम सुरू आहे.
लम्पी चर्मरोगावर नियंत्रण आणण्यासाठी लम्पी चर्म रोग प्रतिबंधात्मक लस निर्मितीचे तंत्रज्ञान उपलब्ध करून घेतले असून त्यामुळे पुण्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय संस्थेमध्ये व्यावसायिक तत्त्वावर लसनिर्मिती लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात राज्य लम्पी चर्म रोगावरील लस उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होऊन राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनास दरवर्षी प्रतिबंधात्मक लसीकरण करणे शक्य आहे.
बाधित जिल्ह्यांची संख्या : २५
सर्वाधिक बाधित जिल्हे : पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, जळगावरोगाचे नवीन केंद्र : ०
रोगाचे एकूण केंद्र : १०८२नवीन बाधित पशुधन : १०८
आतापर्यंत बाधित जनावरे : ९८२०उपचारानंतर बरी झालेली जनावरे : ६६१८
एकूण मृत्यू : ३३९लसीकरण ९३ टक्के
पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे.- डाॅ. प्रवीणकुमार देवरे, आयुक्त, पशुसंवर्धन