पुणे : महापालिकेकडून यंदाही ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. त्यादिवशी लक्ष्मी रस्ता सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद राहणार आहे. लक्ष्मी रस्त्यावर नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हॅप्पी स्ट्रीटचे खेळ आणि रस्ता सुरक्षाबाबत कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
वाहतूक व्यवस्थेमध्ये सर्वांत दुर्लक्षित ठरलेल्या पादचाऱ्याला महत्त्व मिळवून देण्यासाठी पुणे महापालिकेनेे गेल्या चार वर्षांपासून ११ डिसेंबर हा दिवस पादचारी दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौक ते गरुड गणपती चौक हा भाग या दिवशी वाहनांसाठी बंद असणार आहे. हा रस्ता आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार आहे. वाहनविरहित करून तो आकर्षक पद्धतीने सजवण्याचे काम पथ विभागातर्फे हाेणार आहे. दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत हा रस्ता वाहनांना वापरता येणार नाही. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी लक्ष्मी रस्त्यावर यावे, यासाठी महा मेट्रोमार्फत कसबा आणि मंडई मेट्रो स्थानकापासून, पुणे मनपा मेट्रो स्थानकापासून खास सायकलीचे आयोजन करण्यात येत आहे. पीएमपीएलकडून जादा बससेवा पुरविण्यात येणार आहे. युनायटेड वे मुंबईतर्फे लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षेबाबत कार्यशाळा आयोजित केली आहे. एकांश ट्रस्टतर्फे अंध, अपंग नागरिक यांच्याबाबत संवेदनशीलता आणि सार्वत्रिक प्रवेश योग्यताविषयक कार्यशाळा आयोजित केली आहे. सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंटतर्फे पादचारी दिनानिमित्त पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेबाबत काढलेले चित्रकला प्रदर्शन आयाेजित केले आहे.
परिसर संस्थेमार्फत सार्वजनिक वाहतूक आणि जुन्या पुण्याच्या विकासाबाबत पॅनल प्रदर्शनही आयोजित केले आहे. आयईडीटीपी संस्थेमार्फत संख्यांच्या योग्य रचनेबाबत पुणे मनपाने केलेल्या कामांचे पॅनल प्रदर्शन भरवले जाणार आहे. रंग कला अकादमीतर्फे पादचारी दिनानिमित्त भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत हवेच्या गुणवत्तेची चाचणी व स्वच्छ संस्थेमार्फत प्रदर्शन आयाेजित केले आहे, असे पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.