Pune Municipal Corporation fails to handle Kareena's situation | Pune Corona News: पुणे महापालिका काेराेनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी

Pune Corona News: पुणे महापालिका काेराेनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी

ठळक मुद्देकाेराेना विषयी सर्व पक्षीय नेत्यांची आढावा बैठक घ्या - नगसेविकेची महापौरांना विनंती v

पुणे: पुणे शहरात दैनंदिन ६,७ हजार काेराेनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. मागील वर्षीच्या मार्चमध्ये काेराेनाने पुणे शहरात प्रवेश केला हाेता. त्यानंतर महापालिका यंत्रणा सर्वच बाजुंनी सक्षम करण्यात आली होती. सद्यस्थितीत मात्र रुग्णालये, लसीकरण केंद्र, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सर्वच बाबतीत यंत्रणा पूर्णपणे काेलमडली आहे. त्यामुळे पुणे महापालिका कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षनेत्या नगरसेविका दीपाली धुमाळ यांनी असे पत्राद्वारे महापौरांना कळवले आहे. 

पुणे महापालिकेच्या स्वॅब सेंटरमधून प्रतिदिनी हजाराे रूग्णांचे स्वॅब घेतले जात असून याचे रिपाेर्ट चार ते पाच दिवसानंतर मिळतात. ही बाब अत्यंत गंभीर आहे. ताेपर्यंत सदर रूग्ण अनेकांना बाधित करताे. तसेच त्यांचे पूर्ण कुटुंंबही बाधित हाेते. अशा वेळ तातडीने लक्ष घालून काम करणारी यंत्रणा उभी करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.  

पुणे शहरात खाजगी रूग्णालयांमध्ये जे रूग्ण घरी विलगीकरणात राहून बरे हाेवू शकतात, असे रूग्ण देखील पैसे भरून रूग्णालयात दाखल हाेतात, पुणे शहराच्या बाहेरील रूग्ण शहरातील रूग्णालयात दाखल हाेण्याचे प्रमाण वाढलेले असून यावर महापालिकेचे नियंत्रण राहिलेले नाही. असा आरोपही पत्रातून करण्यात आला आहे.   

पुणे महापालिकेने काेराेनाचे रूग्ण वाढल्यानंतर खाजगी रूग्णालयातील ८० टक्के बेडस ताब्यात घेतल्याचे जाहिर केले. पण प्रत्यक्षात यावर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड हेळसांड हाेत आहे. महापालिकेकडून पूर्वी महापालिकेचे अधिकारी खाजगी रूग्णालयावर नेण्यात आले हाेते.  त्यांच्याकडून देखील कामकाज हाेत नाही, त्यांना कामाची काेणतीही माहिती नसते. महापालिकेने रूग्णांना बेडस उपलब्ध ककरण्यासाठी वाॅर रूम तयार केली असून त्याचे नंबर प्रसिध्द केलेले आहेत. यावर नागरिकांनी संपर्क केला असता त्यांना बेडस उपलब्ध करून दिले जात नाही. ऑनलाईन डॅशबाेर्डवर जागा रिक्त दिसतात, परंतू प्रत्यक्षात रूग्णालयात जागा मिळत नाही. ही वस्तुस्थिती असून हा डॅशबाेर्ड देखील वेळाेवेळी अपडेट करणे अत्यंत गरजेचे असताना या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे.

सदयस्थितीत संपूर्ण शहरात रेमडिसिवर या इंजेक्शनाचा तुटवडा भासत असून महापालिकेने यासाठी भविष्याचा वेध घेत तयारी करणे अपेक्षित हाेते. तसेच इतर प्रकारची औषधे देखील रूग्णांना आवश्यक असतात. याची देखील माेठया प्रमाणात खरेदी हाेणे अपेक्षित आहे. हे सर्व साेडून महापालिका प्रशासन माेठमाेठया रकमेच्या निविदा काढण्यात व्यस्त आहे.  शहरात रूग्ण रस्त्यावर मृत्युमुखी पडतील अशी परिस्थिती तयार होऊ लागली आहे. 

आम्ही आपणाकडे तसेच आयुक्तांकडे काेराेना विषयी सर्व पक्षीय नेत्यांची आढावा बैठक घ्या म्हणून वेळाेवेळी मागणी करत आहोत. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील वर्षी प्रशासनाने काेराेनाच्या पार्श्वभूमीवर ज्या पध्दतीने का केले तसे काम देखील सदयस्थितीत हाेत नाही यावर आपण लक्ष घालून तातडीने आढावा बैठकीचे आयाेजन करावे,अशी विनंतीही त्यांनी पत्रातून केली आहे.  
    

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pune Municipal Corporation fails to handle Kareena's situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.