पुणे : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले- तेली यांची गुरुवारी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल प्रखेर -अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उगले यांच्याकडे नागपूर प्रदेश प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उगले यांची बदली करुन पुणे महापालिकेतील भाजप पदाधिका-यांचा हट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुर्ण केला आहे.महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी उगले यांची ११ मे २०१७ रोजी नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय शिस्त, बढती, तसेच निविदा प्रक्रियेतील गोंधळाला चाप लावला होता. त्यावरून सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि उगले यांच्यात वादाचे खटके उडत होते. अनेकदा त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेतही उमटले होते. उगले यांनी आपल्या १९ महिन्यांच्या कारकिर्दीत शिक्षण मंडळ , पालिका कर्मचारी आणि समाज विकास योजनांचा लाभ थेट डीबीटी द्वारे देणे, शाळांच्या सुधारणांसाठी बाला प्रकल्प, प्रकल्पांचा नियमित आढावा घेण्यासाठी प्रत्येक बुधवारी वॉर रूमची बैठक असे उपक्रम राबविले होते. तर, शहरातील स्वच्छतागृहे पाडण्याच्या प्रस्तावांना त्यांनी मनाई केल्याने महिला आणि बालकल्याण समिती मधील सदस्यांशी त्यांचे वादही झालेले होते. त्याचे पडसाद अनेकदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटून नगरसेवकांनी थेट उगले यांच्या बदलीची मागणीही केली होती.त्यानंतर भाजपच्या सुमारे ८० हून नगरसेवकांनी त्यांच्या बदलीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविली होती. पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उगले यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पदाधिका-यांचे कान टोचले होते. मात्र पदाधिकारी उगलेंच्या बदलीवर अडून बसले होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हट्ट पूर्ण केला. शितल उगले यांच्या रिक्त होणा-या अतिरिक्त आयुक्तपदावर रूबल प्रखेर- अगरवाल यांची राज्यशासनाकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्था शिर्डी या पदाचा पदभार आहे. अगरवाल या २००८ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील बॅचच्या अधिकारी असून रूबल यांनी या पूर्वी अहमदनगर जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर मार्च २०१७ मध्ये त्यांची शिर्डी येथे बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता त्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:58 IST
अनेकदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपाच्या नगरसेवकांनी थेट उगले यांच्या बदलीची मागणीही केली होती.
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांची बदली
ठळक मुद्देअतिरिक्त आयुक्तपदावर रूबल प्रखेर- अगरवाल यांची राज्यशासनाकडून नियुक्तीअगरवाल या २००८ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील बॅचच्या अधिकारी