पुणे : महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रोमार्गाचा डीपीआर (सर्वंकष प्रकल्प अहवाल) महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी दिली.
अहवालानुसार वनाज ते चांदणी चौक या १.२ कि.मी. मार्गाचे व रामवाडी ते वाघोली या ११.६३ कि.मी. अंतरावर मेट्रोचे विस्तारीकरण केले जाणार आहे. वनाज ते चांदणी चौक मार्गासाठी ३४३ कोटी, तर वाघोलीपर्यंतच्या मार्गासाठी ३ हजार १४ कोटी रुपये खर्च येणार आहे. या मार्गाचे काम पुढील वर्षी म्हणजे २३-२४ मध्ये सुरू झाले तर ते पूर्ण होण्यासाठी पाच वर्षे लागणार आहेत.
वनाज मार्गावर कोथरूड पीएमटी डेपो व चांदणी चौक अशी दोन स्टेशन्स असणार आहेत; तर रामवाडी ते वाघोली या अंतरात ११ स्टेशन्स राहणार आहेत. खराडी बायपास, वाघोली आणि विठ्ठलवाडी असा हा मार्ग असणार आहे.
दरम्यान, पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गाचे कात्रजपर्यंत मेट्रो विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. महामेट्रोकडून खडकवासला ते स्वारगेट, स्वारगेट ते हडपसर, एसएनडीटी ते वारजे, हडपसर ते खराडी आणि एचसीएमटीआरवरील (निओ मेट्रो) अशा एकूण ८२.५ किलोमीटरच्या मेट्रोचे डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे.