पुणे : शहरात आणि जिल्ह्यात गॅस सिलिंडरसाठी ऑनलाइन बुकिंग आणि ‘ओटीपी’द्वारेच वितरण अशी पद्धती निश्चित केल्यानंतर दोन दिवसांपासून सिलिंडर वितरणात सुधारणा झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यानुसार मंगळवारी व बुधवारी शहर व जिल्ह्यात सुमारे ८० ते ८५ हजार सिलिंडरची मागणी नोंदविण्यात आली. तर प्रत्यक्षात सुमारे ८५ ते ९० हजार सिलिंडरचे वितरण करण्यात आले आहे. यात पूर्वी नोंदविण्यात आलेल्या सिलिंडरचाही समावेश आहे. तर पुढील तीन ते चार दिवसांत ही व्यवस्था आणखी सुरळीत होईल, असा विश्वासही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला आहे.
युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या आठवड्यात ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने यात वेळीच हस्तक्षेप करत व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. तर घरगुती सिलिंडरचे वितरणही केवळ ऑनलाइन बुकिंगद्वारेच करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे एजन्सींसमोरील रांगा कमी करण्याचा उद्देश होता. त्याचे दृश्य परिणाम गेल्या दोन दिवसांपासून दिसत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.
सध्या मागणीच्या तुलनेत गॅस सिलिंडरचा पुरवठा अधिक असून, नोंदणीनंतर ९६ तासांत सिलिंडर वितरित करण्यासाठीची व्यवस्था सुरळीत होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर म्हणाले, “तेल कंपन्यांकडून सिलिंडरचे वितरण सुरू असले तरी काही प्रमाणात नागरिकांनी सिलिंडरची नोंदणी करून दहा दिवस झाले तरी तो उपलब्ध नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत सिलिंडरचा जिल्ह्यात पुरवठा पूर्ववत होईल.”
जिल्ह्यात मंगळवारी ८४ हजार ९८७ सिलिंडरची मागणी गॅस कंपन्यांकडे करण्यात आली होती. तर कंपन्यांकडून ९५ हजार ५७१ सिलिंडर एजन्सींपर्यंत पोच करण्यात आले. त्यापैकी एजन्सींनी ८९ हजार ७५८ ग्राहकांना सिलिंडरचे वितरण केले. त्यात सर्वाधिक ४५ हजार ९८३ सिलिंडर भारत गॅस कंपनीकडील आहेत. तर एचपी गॅस कंपनीने ३७ हजार ८०४ व इण्डेनने ५ हजार ९७१ सिलिंडरचे वितरण केले. हीच स्थिती बुधवारीही होती. या दिवशी ७७ हजार ५६४ सिलिंडरची मागणी नोंदविण्यात आली. तर प्रत्यक्षात कंपन्यांकडून ९२ हजार ८४३ सिलिंडर एजन्सींना देण्यात आले. त्यापैकी ८४ हजार ३६१ सिलिंडरचे ग्राहकांना वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यात सर्वाधिक ४१ हजार ५५७ सिलिंडर भारत गॅस कंपनीकडील आहेत. तर एचपी गॅस कंपनीने ३८ हजार २०७ व इण्डेनने ४ हजार ५४४ सिलिंडरचे वितरण केले.
शहर, जिल्ह्यात आता ऑनलाइन नोंदणीनुसार नागरिकांना घरपोच सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागरिकांच्या तक्रारीचे प्रमाण कमी झाले आहे. सिलिंडर पुरवठा सुरळीत होऊ लागला आहे. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
Web Summary : Pune's gas cylinder distribution sees improvement after implementing online booking and OTP verification. Daily distribution reached 85-90 thousand cylinders, addressing previous supply disruptions. Authorities expect further stabilization soon, ensuring timely delivery within 96 hours of registration. Citizen complaints have reduced.
Web Summary : पुणे में ऑनलाइन बुकिंग और ओटीपी सत्यापन लागू करने के बाद गैस सिलेंडर वितरण में सुधार हुआ। दैनिक वितरण 85-90 हजार सिलेंडरों तक पहुंचा, जिससे पिछली आपूर्ति व्यवधानों का समाधान हुआ। अधिकारियों को जल्द ही और स्थिरता की उम्मीद है, जिससे पंजीकरण के 96 घंटों के भीतर समय पर डिलीवरी सुनिश्चित हो सके। नागरिकों की शिकायतें कम हुई हैं।