पुणे : जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी निवडणूक रिंगणात महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले होते. त्यामुळे दोस्तीत कुस्ती पाहायला मिळाली. मात्र, आता या कुस्तीचा आज निकाल लागणार आहे. आतापर्यंत विजय आमचाच म्हणणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला आहे. कोण कोणाला चितपट करणार आणि कोण किती पाण्यात आहे याचाही फैसला आहे.
जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी ६८.१ टक्के इतके मतदान झाले होते. निवडणूक एकत्र लढायच्या की स्वतंत्र याबाबत शेवटपर्यंत स्पष्ट संकेत न मिळाल्यामुळे बहुतांश ठिकाणी दोस्तीतील कुस्ती पाहायला मिळाली. महायुतीतील मित्र पक्षच एकमेकांपुढे उभे राहिले होते, तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांशी युतीदेखील करण्यात आली. जुन्नरमध्ये शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत पाहायला मिळाली. या ठिकाणी आमदार शरद साेनवणे यांनी ताकद पणाला लावली आहे. चाकण, आळंदी आणि राजगुरूनगरमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांचा प्रभाव अधिक आहे. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडल्या. चाकणला तीन जागा बिनविरोध झाल्या असून, शिंदे गटाने उद्ववसेनेबरोबर युती करत त्यांच्यासाठी दोन जागा सोडल्या होत्या. चाकण नगरपरिषदेसाठी शिंदे गट- राष्ट्रवादी-भाजप- काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली, तर राजगुरुनगरमध्ये आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी एकमेकाला आधार देत शिंदे गटासमोर आव्हान उभे केल्याचे दिसले, तर तिकडे आळंदीमध्ये पंचरंगी लढत झाली. भाजपने २० जागा लढवल्या, तर अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने ६, राष्ट्रवादीने १५ जागा लढवल्या आहेत. शिवाय तीन तगडे अपक्ष उमेदवारदेखील रिंगणात होते. शिरूरमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार गटात झाली आहे.
इंदापूर नगरपरिषदेसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चांगलीच ताकद पणाला लावल्याचे दिसले. त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकवटले होते. त्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांचा सहभाग महत्त्वपूर्ण मानला जात होता. या ठिकाणी अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. तिकडे माजी आमदार संजय जगताप हे भाजपमध्ये गेल्यामुळे अनेक समीकरणे बदलली गेली. जेजुरीतील शरद पवार गटाचे जयदीप बारभाई यांच्यासह सर्व उमेदवार थेट अजित पवार गटात दाखल झाले. यामुळे त्या ठिकाणी संजय जगताप यांच्या गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत झाली. मात्र, सासवडमध्ये अजित पवार गटाला शिंदे गटाशी जुळवून घ्यावे लागले. आमदार विजय शिवतारे गट विरुद्ध माजी आमदार संजय जगताप गट म्हणजेच शिंदे गट आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत झाली. तिकडे भोरलाही आजी-माजी आमदारांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आमदार शंकर मांडेकर आणि संग्राम थोपटे हे पुन्हा एकदा या निवडणुकीमुळे आमने-सामाने आले आहेत. थोपटे यांचे निकटवर्तीय असलेले आवाळे यांना थेट मांडकेरांनी राष्ट्रवादीच्या गोटात दाखल करून घेतले होते. त्यामुळे इथले राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. दौंडला नेहमीप्रमाणे पारंपरिक राष्ट्रवादी विरुद्ध आमदार राहुल कुल अशीच लढत पाहायला मिळाली.
माळेगावला अपक्ष करणार चमत्कार
माळेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रंजन तावरे एकत्र आले होते. या दोघांविरोधात शरद पवार गट उतरला होता. मात्र, या गटाला वरिष्ठांकडून अपेक्षित अशी ताकद न मिळाल्याने काही उमेदवारांनी स्वत:च्या हिमतीवरच लढत दिली, तर दुसरीकडे प्रत्येक प्रभागामध्ये अपक्षांचा बोलबाला दिसला. विशेष म्हणजे या अपक्षांमुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हे अपक्ष चमत्कार करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला
मंचर नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवल्याने शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिंदे गटाचे दत्ता गांजाळे यांनी सर्वांची मोट बांधत निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांना त्यात कितपत यश येईल हे आज स्पष्ट होईल.
Web Summary : Pune district's local elections saw coalition partners clashing. Results today will reveal victors in multi-cornered fights across Nagar Parishads and Nagar Panchayats. Key battles include those in Junnar, Indapur, and Saswad, with the fate of independent candidates in Malegaon also closely watched.
Web Summary : पुणे जिले के स्थानीय चुनावों में गठबंधन सहयोगियों का टकराव दिखा। आज परिणाम नगर परिषदों और नगर पंचायतों में बहुकोणीय लड़ाइयों में विजेताओं का खुलासा करेंगे। जुन्नर, इंदापुर और सासवड में महत्वपूर्ण मुकाबले हैं, साथ ही मालेगांव में स्वतंत्र उम्मीदवारों के भाग्य पर भी बारीकी से नजर रखी जा रही है।