नीरा : पुरंदर तालुक्यातील वाल्हे व आसपासच्या परिसरात सध्या बिबट्याने मोठ्या प्रमाणात त्रास वाढवला आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात थंडीची लाट यायची सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडून आठवड्यातून जास्तीत जास्त वेळ रात्रीचा वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त झाला आहे आणि आता दिवसा वीज देण्याची मागणी करत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या अडचणीकडे राजकीय नेते सोयीस्कर पद्धतीने दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नीरा येथील वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन दिवसा वीज दिली जावी अशी मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वाल्हे व परिसरात वीज वितरण कंपनी शेतीसाठी रात्रीच्या वेळीच वीजपुरवठा करत आहे. हाताशी आलेले पीक वाया जाऊ नये, म्हणून शेतकरी रात्री थंडीच्या लाटेतही कुडकुडून आपल्या पिकाला पाणी देत असतो. मात्र, अशा वेळी वीज अचानक बंद पडते. डीपीतील फ्युज खराब होणे, लिंक खालावणे यांसारख्या घटनांमुळे शेतकऱ्यांना त्रास होतो; परंतु जेव्हा शेतकऱ्यांनी वीज वितरण कर्मचाऱ्यांना फोन करून दुरुस्तीची मागणी केली, तेव्हा कर्मचाऱ्यांकडून "थंडी फार आहे आणि परिसरात बिबट्या फिरतो, आम्ही येऊ शकत नाही", असे सांगितले जाते. परिणामी शेतकरी रात्रभर ताटकळत राहतो व त्याचा एक दिवस वाया जातो.
रात्रीचे बिघाड दुरुस्त न केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देणे शक्य होत नाही आणि त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. सरकार मोफत वीज देण्याचा दावा करत असले तरी, शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज फारच कमी वेळासाठी असते, ज्यामुळे पिकांची योग्य काळजी घेता येत नाही आणि उत्पादनात मोठी घट होते. सध्या गहू, ज्वारी, हरभरा, गरवी कांदा आणि इतर तरकारी पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. मागील काळात चांगल्या पावसामुळे विहिरींमध्ये टंचाई नाही, मात्र वीज न मिळत असल्याने शेतकऱ्यांकडे विहिरीमध्ये पाणी असूनही शेताला पाणी देता येत नाही. अशा परिस्थितीत वाल्हे येथील शेतकरी फत्तेसिंग पवार, माणिक महाराज पवार, बाबासाहेब थोपटे, राजेंद्र चिकणे, आर. आर. राऊत, भाऊसाहेब भुजबळ, मच्छिंद्र भुजबळ, विनोद पवार व आसपासच्या शेतकऱ्यांनी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा वीज विभागाला दिलेला आहे.
पिंगोरी येथील शेतकऱ्यांची देखील दिवसा वीज देण्याची मागणी -
वाल्हेनजीक व डोंगर दऱ्यात असलेल्या पिंगोरी परिसरातही बिबट्याने मोठा त्रास वाढवला आहे. बिबट्या रात्रीच नव्हे, तर दिवसा सुद्धा शेतात येत असून, शेतकऱ्यांना दिवसा शेतात जाणे कठीण झाले आहे. वन विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच, आठवड्यातून पाच दिवस फक्त रात्रीच वीज दिली जात असल्यामुळे, रात्री शेतामध्ये असतानाही अनेकदा बिबट्याचा धाक अनुभवावा लागतो, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे या भागातील शेतकरी, तसेच सरपंच संदीप यादव आणि पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी दिवसा वीजपुरवठ्याच्या मागणीसह वीज वितरणावर दबाव टाकण्याचे आवाहन केले आहे.
अडचणीतील शेतकऱ्यांकडे पुढाऱ्यांचे दुर्लक्ष -
सध्या मोठ्या प्रमाणात थंडीची लाट असून, त्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज अत्यंत गरजेची आहे. तसेच, रात्री, अपरात्री आणि दिवसा फिरणारे बिबटे शेतकऱ्यांसमोर मोठा धोका निर्माण करत आहेत. मात्र, पुरंदर तालुका पातळीवरील नेते, आजी, माजी आमदार यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. निवडणुकीच्या आधी राजकारण्यांनी फक्त मतदारांकडे लक्ष दिले असून, शेतकऱ्यांची अडचण त्यांना महत्त्वाची वाटत नाही. अनेक शेतकऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे की, नेते निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत.
Web Summary : Purandar farmers, facing leopard threats and cold, demand daytime electricity due to nighttime power cuts. Crop damage looms, and officials cite leopard danger, neglecting farmer needs. Protests threatened.
Web Summary : पुरंदर के किसान तेंदुए के खतरे और ठंड से जूझ रहे हैं, रात में बिजली कटौती के कारण दिन में बिजली की मांग कर रहे हैं। फसल नुकसान का खतरा है, अधिकारी तेंदुए के खतरे का हवाला दे रहे हैं, किसानों की जरूरतों को अनदेखा कर रहे हैं। विरोध की धमकी दी गई।