पुणे : समुद्रसपाटीवरील वाऱ्याची द्रोणीय रेषा दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात रविवार (दि. ६) आणि सोमवारी (दि. ७) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.कोकणात ठाणे, पालघर व रत्नागिरीमधील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असून, वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५ किमी असणार आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट परिसरात दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पुढील दोन दिवस पुण्याच्या घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार, तर तुरळक ठिकाणी २० सेमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याच्या घाट परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे.राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर शनिवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस होत आहे. मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार व अति मुसळधार पाऊस होणार आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दि. ७ जुलै रोजी विदर्भात भंडारा व दि. ७ आणि ८ जुलै रोजी गोंदियात मेघगर्जनेसह अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात दोन दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
Heavy Rains : राज्यात मुसळधार;पुढील दोन दिवस पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 14:04 IST