पुणे : सिंहगड रस्त्यावर गुलियन बॅरी सिंड्रोमची (जीबीएस) आजाराचे रुग्ण आढळले होते त्या परिसरातून (क्लस्टर) शेवटचा रुग्ण १८ फेब्रुवारीला आढळला होता. तेथून नवीन रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे ही साथ आटोक्यात आली असून लवकरच याचे सर्वेक्षण बंद करण्यात येणार आहे. त्या बाबतचे पत्र आरोग्य उपसंचालक व साथरोग विभागाला देण्यात येणार आहे.
दूषित पाण्यामुळे व त्यामध्ये सापडलेल्या कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी व नोरोव्हायरसमुळे 'जीबीएस' आढळून आल्याचे सद्यःस्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे त्याबाबत पाणीपुरवठा शुद्धीकरण करून हा प्रश्न आटोक्यात आला आहे. तसेच सध्या जी रुग्णसंख्या आढळून येत आहे ती नियमितपणे आढळून येणारी आहे. त्यामध्ये सिंहगड रस्त्यावरील साथीचा संबंध नाही. तसेच कोणत्याही आजाराचे सर्वेक्षण थांबविताना त्या आजाराचा अधिशयन काळ (विषाणूची, जीवाणूची लागण झाल्यापासून लक्षणे दिसण्यापर्यंतचा काळ) पूर्ण झाला तरी रुग्ण न आढळल्यास त्या आजाराची साथ नियंत्रणात आल्याचे समजले जाते. त्यानुसार फेब्रुवारीच्या १८ तारखेला शेवटचा रुग्ण आढळल्याने त्याला महिना होत आहे.
सध्या रोज घरोघर संशयित रुग्णांची तपासणी व सर्वेक्षण सुरू आहे. ते थांबविण्यात येईल. महापालिकेच्या बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या डायरियाच्या रुग्णांची नोंद ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल व उपचार केले जातील. पाण्याची सातत्याने तपासणी करण्याबाबत पाणीपुरवठा विभागालाही पत्र दिले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.