पुणे : गणेशोत्सव म्हटलं की मंडपांची आरास, आरतींचा गजर, भक्तांची गर्दी, ढोलताशांचा दणदणाट... पण, यंदा एक वेगळं चित्रही साऱ्यांना जाणवतंय. रस्त्यावर, मंडपात आणि घराघरांत जसा उत्सव फुलला आहे तसाच जल्लोष आता सोशल मीडियावरही रंगला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, द्विटरपासून ते यूट्यूबपर्यंत सगळीकडे फक्त 'गणपती बाप्पा मोरया'चाच गजर आहे.
पहाटेपासूनच गणरायाच्या आगमनाच्या शुभेच्छांचा वर्षाव व्हॉट्सअॅपवर सुरू झाला. कुणी आकर्षक जीआयएफ तर कुणी बाप्पांचे अॅनिमेटेड स्टिकर्स शेअर केले. गोड आवाजातल्या आरत्या, गणपती भजनं, 'विघ्नहर्ता'वरील भक्तिगीते अशा शेकडो क्लिप्समुळे प्रत्येक ग्रुपमध्ये भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीयांपासून ते मित्रमंडळींपर्यंत आणि ऑफिस ग्रुप्सपासून शेजारच्या मंडळांपर्यंत सर्वत्र बाप्पांच्या शुभेच्छांचा पाऊस पडतोय.
फेसबुकवर तर गणेशोत्सवाची धमाल वेगळीच आहे. शहरातील मोठमोठ्या मंडळांनी आपली सजावट, आरास, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे देश विदेशातील भाविकांपर्यंत पोहोचवले आहेत. 'लाइव्ह दर्शन' या उपक्रमामुळे परदेशात असलेले मराठी बांधवही आपल्या गणरायाचे दर्शन घेत आहेत. फेसबुकवर प्रत्येक पोस्टसोबत 'जय देव जय देव'चा आवाज अक्षरशः ट्रेंडिंगमध्ये आहे.
इन्स्टावर रील्स व्हायरल...
तरुणाईसाठी इन्स्टाग्राम म्हणजे सण साजरा करण्याचं खास व्यासपीठ. सजावट दाखवणाऱ्या रील्स, बाप्पाच्या आगमनाचे व्हिडिओ, ढोल-ताशांच्या थरारक परफॉर्मन्सचे क्लिप्स, आरतीच्या धूनवर बनवलेले ट्रेंडिंग रील्स यामुळे इंस्टा-फीड पूर्णपणे गणेशोत्सवमय झाला आहे. 'बाप्पा आला रे' आणि 'सुखकर्ता दुखहर्ता' यांसारखे गाणे रील्सवर व्हायरल झाले आहेत.भक्त मंडळी गणेशोत्सवाशी संबंधित आपले अनुभव, फोटो, श्रद्धा आणि आठवणी द्वीट करून शेअर करत आहेत. अनेक मंडळे सामाजिक संदेश देणाऱ्या पोस्ट करत आहेत जसे की 'प्लास्टिकला नाही', 'स्वच्छता मोहीम', 'रक्तदान शिबिर' गणेश मंडळांनी आपले भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत आरत्या आणि नृत्य स्पर्धांचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर सुरू केले आहे.