पुणे : यंदा पुण्याच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा झालेला वापर आणि रात्रीच्या वेळेस डीजे सिस्टिम्सवरील नियंत्रणामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सरासरी आवाजाची पातळी गेल्या काही वर्षांपेक्षा कमी म्हणजे ९२.६ डेसिबल्स एवढीच नोंदविली गेली. मात्र, त्याची कसर रविवारी (दि. ७) डीजेच्या दणदणाटाने भरून काढली. खंडोजी बाबा चौकात दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता १०९.० डेसिबल्सची नोंद झाली.
गेल्या काही वर्षांत सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडळांकडून डीजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण किती होते? याबाबत गेल्या २५ वर्षांपासून सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे लक्ष्मी रस्त्यावरील १० चौकांमध्ये ध्वनी पातळीची नोंद होते. सीईओपीच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे प्रमुख महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नोंद केली जाते. यात मृणाल खुटेमाटे, सुमेध ब्राह्मणकर, आर्या घाडगे, अदिती तळोकार, श्रावणी शिंदे, क्रिश खोलिया, अथर्व राखोंडे, प्रथमेश पोधाडे, ओम सोनवणे, शंतनु केले, संचिता पाटील, ओम बेहरे, साहिल अग्रवाल, भूमिका अवचट, आदित्य संजीवी, कार्तिक गायखे, सुयोग सावंत, आदर्श चौधरी, उत्कर्षा काकड, अस्मिता गोगटे, स्वराली आवळकर, सिद्धार्थ शिडीद, वेदांत जोशी आणि मेहर रघाटाटे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
बेलबाग चौकात शनिवारी (दि. ६) रात्री ८ वाजता शंभराची पातळी ओलांडली गेली, १०५.६ डेसिबल इतकी आवाजाच्या पातळीची नोंद झाली. त्यानंतर रविवारी (दि. ७) मध्यरात्री १२ नंतर आणि सकाळी ६ वाजता हा आवाज कायम होता. सकाळी ८ वाजता आवाजाच्या पातळीत ९४ पर्यंत घट झाली. खंडूजीबाबा चौकात (दि. ६) दुपारी १२ वाजता ६१.६ इतक्या कमी पातळीची नोंद झाली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता १०९.० डेसिबल इतका आवाज वाढला.
गेल्या तीन वर्षांतील आवाजाची आकडेवारी
वर्ष डेसिबल
२०२२ : १०५.२
२०२३ : १०१.२
२०२४ : ९४.८
२०२५ : ९२.६
प्रदूषण मंडळाने आखलेली डेसिबल
क्षेत्र : दिवसा : रात्री
औद्योगिक क्षेत्र : ७५ : ७०
व्यापारी क्षेत्र : ६५ : ५५
निवासी क्षेत्र : ५५ : ४५
शांतता क्षेत्र : ५० : ४०
प्रदूषण मंडळाकडून २०० ठिकाणी निरीक्षण
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील शहरातील २०० मंडपांमध्ये ध्वनी निरीक्षण केले. मागील वर्षीच्या तुलनेत काही ठिकाणी ध्वनी पातळी कमी झाली असली तरी काही भागांमध्ये लक्षणीय वाढल्याचे निरीक्षण नोंदवले.