पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव झाला, या शे-सव्वाशे वर्षांतील गणेशोत्सवातील खरेखुरे वेगळेपण असलेला वर्गणी मागण्याचा प्रकार आता जवळपास थांबल्यातच जमा झाला आहे. उत्सवातील चैतन्य, उत्साह, रसरसलेपण 'लोकल'पासून 'ग्लोबल' झाले. मात्र, घरोघरी जाऊन जमा केलेल्या वर्गणीतून होणारा उत्सव आता एकरकमी मिळणाऱ्या देणगीमधून साकार होताना दिसत आहे.कार्यकर्ते आणि वर्गणीदारसार्वजनिक गणेशोत्सवात मागील अनेक वर्षे काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना हा फरक तीव्रतेने जाणवत आहे. गल्लीतील तरुण मुले हातात छापील पावती पुस्तक घेऊन गल्लीत फिरू लागल्यानंतर गणेशोत्सव आल्याचे समजायचे, नावाजलेल्या धनिकापासून एकजात सगळे व्यावसायिक व घरापर्यंत हे कार्यकर्ते पोहोचत. एक रुपयापासून ते १५१ व त्यापटीतच पुढे थेट ११ हजार १११ पर्यंत देणग्या घेतल्या जात. लहानमोठ्या व्यावसायिकांच्या वर्गणीदारांना त्यांची मागील वर्षाची पावती दाखवली जात असे. ती १०१ रुपयांची असेल तर त्यात थोडी वाढ करून १५१ रुपये घेतले जात. किमान महिनाभर आधी वर्गणीचा प्रकार सुरू होई. त्यातूनच कार्यकर्ते तयार होत. कसे बोलायचे, कसे वागायचे याचे प्रशिक्षण मिळे. कलहाचा प्रसंग आला तर मार्ग कसा काढायचा, हे शिकायला मिळे.
उदार आश्रयदातेमागील काही वर्षांत हा वर्गणी मागण्याचा प्रकार जवळपास पूर्ण थांबला आहे. १ परिसरातील एखादाच धनिक किंवा शहरातील मोठा व्यावसायिक मंडळाचा आश्रयदाता होतो.२ एकरकमी देणगी मंडळाला देतो. मग मंडळ परिसरात त्याच्या नावाचे फ्लेक्स झळकतात, त्याच्या उत्पादनाची जाहिरात कमानींवर होते. फार मोठी देणगी असेल तर मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन वगैरे त्याच्या हातून केले जाते.त्याला मंडळात पदाधिकारी म्हणून घेतले जाते. त्याला मंडळाच्या कामात महत्त्व 3 मिळेल, याची काळजी घेतली जाते, प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे याप्रमाणे एकापेक्षा जास्त देणगीदार आहेत.४ दोनचार हजार कुटुंबांकडून एकदोन लाख रुपयांची वर्गणी जमा करण्याऐवजी चारदोन देणगीदारांकडून काही लाख रुपये विनासायास जमा करण्याचा हा मार्ग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्याही सोयीचा असल्याने त्यांच्याकडून याचाच वापर मागील काही वर्षांत केला जात आहे.यातून वर्गणी नावाचा लोकसहभागाचा प्रकार थांबला असून, देणगीदाराचा उदार आश्रय अशी नवी पद्धत उत्सवात सुरू झाली आहे.
बदल अपरिहार्यभारी देखावा, भारी विद्युतरोषणाई, भारी डीजे, भारी सजावट असे हे सगळे भारी प्रकरण फक्त जमा वर्गणीतून भागणारे नसल्यानेच असे देणगीदारच मिळवण्याकडे सार्वजनिक मंडळांचा कल वाढला. त्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सव प्रचंड झगमगाटी झाला असल्याचे दिसते आहे. देणगीदारांसाठी सामाजिक, काही प्रमाणात राजकीय प्रतिष्ठा मिळवण्याचा हा मोठाच मार्ग मागील काही वर्षात खुला झाला आहे.त्याशिवाय देवाधर्मासाठी खर्च केल्याचे समाधान मिळते ते वेगळेच. जागतिकीकरणाच्या धोरणाचे देशातील अनेक क्षेत्रांवर जे परिणाम झाले त्यात सार्वजनिक उत्सवाचे, त्यातही गणेशोत्सवाचे हे बदलेले स्वरूप हाही एक परिणाम आहेच.
कार्यकर्ता तयार होण्याची फॅक्टरीगणेशोत्सवाने पुण्यातून अनेक नेते-कार्यकर्ते शहराच्या, राज्याच्या व देशाच्याही सार्वजनिक जीवनाला दिले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेकविध क्षेत्रात अगदी सुरुवातीच्या काळात गणेश मंडळामध्ये कार्यरत असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांचे सुरुवातीचे दिवस गणेश मंडळातील कार्यकर्ता असेच आहेत. आताचे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यापर्यंत ही परंपरा कायम आहे. कार्यकर्ता तयार होण्याची ही प्रक्रियाच आता देणगीदार संस्कृती फोफावल्यामुळे थांबली आहे. आता ठेकेदारच पदाधिकारी व कार्यकर्ते होतात.
गणेश मंडळांतील स्पर्धागणेशोत्सवात सध्या अनेक गणेश मंडळांमध्ये कोण अधिक चांगल्या प्रकारे देखावा साकारणार? मिरवणुकीत कोणाची किती पथके आहेत? यंदा कोणत्या थीमवर देखावा साकारणार याबाबतही मंडळांमध्ये सुप्त स्पर्धा सुरू असल्याचे पाहायला मिळते.
पगारी बाऊन्सरची नियुक्तीभारी देखाव्यांचे नियोजन करायला, जमलेली गर्दी आटोक्यात आणायला पूर्वी मंडळाचे कार्यकर्ते काम करायचे. आता या कामांसाठी खास बाऊन्सर आणले जातात. काळ्या गणवेशात बळकट शरीरयष्टी असलेल्या या पगारी कर्मचाऱ्यांना ना मंडळाविषयी जिव्हाळा असतो, ना गर्दीतील सामान्यांविषयी आपुलकी! त्यामुळे व्यावसायिक पद्धतीने ते गर्दी हाताळतात. कधी दम देऊन व प्रसंग आलाच तर चार दणके देऊनही. यातून वादाचे प्रसंग उद्भवतात. मंडळाच्या अध्यक्षांचेच ऐकायचे असे त्यांना सांगितलेले असते. विसर्जन मिरवणुकीतही असेच बाउन्सर नियुक्त केले जातात. त्याशिवाय दहा दिवसांच्या उत्सवाचे नियोजनही आता इव्हेंट कंपनीला दिले जाते. तिथलाही कार्यकर्त्यांचा सहभाग थांबला आहे.
स्थानिक कलावंत उपेक्षितदेखावा हा मंडळातीलच कलाकार कार्यकर्त्यांनी तयार केलेला असायचा. त्याला मंडळाचेच अन्य कार्यकर्ते साह्य करायचे. आता मात्र व्यावसायिक पद्धतीने देखावे महिनाभराचे शुल्क देऊन आणले जातात. तेही कलाकारांनीच तयार केलेले असतात. मात्र, त्यांचा व मंडळाचा काहीएक संबंध नसतो. देखावा भारी हवा इतकीच मंडळांची मागणी असते. त्यासाठी हवे तितके पैसे मोजायला ते तयार असतात. आता तर कलानिर्देशक म्हणून काम करणाऱ्यांनाच भरमसाठ पैसे देऊन देखावे तयार केले जातात. त्यामध्ये स्थानिक कलावंत मारले गेले आहेत, किंवा मग त्यांनी अंगी व्यावसायिकता बाणवली आहे.