पुणे : प्रेमसंबंधास विरोध केल्याने मामावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात घडली. याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणाविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण धनकवडीतील आंबेगाव पठार भागात राहायला आहे. तरुणाच्या भाचीबरोबर आरोपीचे प्रेमसंबंध होते. मुलगी अल्पवयीन असल्याने तिचा तक्रारदार तरुण, तसेच मुलीच्या आईने मुलाला २ ते ३ वेळा समजावून सांगितले होते. मुलगी १५ वर्षांची आहे. तिच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवू नको, असे त्याला सांगितले होते. मामा आणि मुलीची आई प्रेमसंबंधांना विरोध करत असल्याने अल्पवयीन मुलगा चिडला होता.
तक्रारदार तरुण मंगळवारी (दि.२२) सकाळी दहाच्या सुमारास दुचाकीवरून कामावर निघाला होता. त्यावेळी आरोपी आंबेगाव पठार परिसरात आला. त्याने मामाला अडवून आमच्या प्रेम प्रकरणात आडवा येऊ नको, अशी धमकी दिली. तरुणावर कोयता उगारला. त्याच्या डाव्या हाताच्या पंज्यावर कोयत्याने वार करून आरोपी पसार झाला. पुढील तपास पोलिस करत आहेत.