पुणे : लष्करी अभियांत्रिकी सेवा (एमईएस), खडकी येथे कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. सहायक गॅरिसन अभियंता सुनील निकम आणि कनिष्ठ अभियंता सुरेश म्हस्के अशी संशयित आरोपींची नावे आहेत. हे दोघे तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना सीबीआयने ही कारवाई केली.
सीबीआयकडे प्राप्त तक्रारीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी तब्बल ६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार एका खासगी कंपनीचा पॉवर ऑफ ॲटर्नीधारक असून, एमईएसअंतर्गत कामाचा करार करत होता. कामे पूर्ण होऊनही व पूर्णत्व प्रमाणपत्रे सादर करण्यात आली असतानाही, देयके अडवून लाच देण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
वाटाघाटीनंतर संशयित अधिकाऱ्यांनी पहिल्या हप्त्यापोटी २ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार सीबीआयने दि. ५ फेब्रुवारी रोजी सापळा रचत तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंत्याला पकडले. लाचेची रक्कम त्याच्या कार्यालयातून जप्त करण्यात आली. या प्रकरणातील कटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सहायक गॅरिसन अभियंत्यालाही अटक करण्यात आली.
दरम्यान, संशयित आरोपींच्या निवासी व कार्यालयीन ठिकाणी झडती घेण्यात आली असता, महत्त्वाची कागदपत्रे तसेच १ लाख ८८ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.
Web Summary : Two MES officers arrested by CBI in Pune for accepting ₹2 lakh bribe. They allegedly demanded ₹6 lakh to clear pending bills for completed works. Raids recovered cash and documents.
Web Summary : पुणे में सीबीआई ने एमईएस के दो अधिकारियों को 2 लाख रुपये की रिश्वत लेते गिरफ्तार किया। आरोप है कि उन्होंने पूरे हो चुके कार्यों के लंबित बिलों को क्लियर करने के लिए 6 लाख रुपये की मांग की थी। छापेमारी में नकदी और दस्तावेज बरामद।