पुणे : ‘आज तुमचा विषयच संपवतो,’ असे म्हणत अल्पवयीन गुन्हेगारांच्या टोळीने भररस्त्यात एकाला मारहाण करत त्याच्यावर गोळीबार केला. वडगाव बुद्रुक येथील चरवडवस्तीत पूर्ववैमनस्यातून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात एक १७ वर्षीय तरुण जखमी झाला. आरोपींनी त्याच्या साथीदाराच्या दिशेने फायर केले. मात्र, सुदैवाने तो बचावला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (दि. ७) मध्यरात्री चरवडवस्ती भागात ही घटना घडली. याबाबत एका १७ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि त्याचे मित्र मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. यावेळी चरवडवस्ती येथील मोकळ्या मैदानात आरोपींनी त्यांना अडवले. जुन्या वादाची खुन्नस मनात धरून आरोपींनी फिर्यादीला पाहताच, ‘आज तुमचा खेळच संपवतो,’ अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. आरोपींनी फिर्यादीवर लोखंडी शस्त्रांनी वार केले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हाणामारी सुरू असतानाच, एका आरोपीने पिस्तूल काढून फिर्यादीच्या दिशेने थेट गोळीबार केला. पिस्तूलमधून सुटलेली गोळी फिर्यादीच्या मांडीत शिरली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. फिर्यादीच्या मित्रालाही जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच्या दिशेने गोळी झाडली, मात्र, सुदैवाने त्याचा नेम चुकला आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आरोपी परिसरात दहशत निर्माण करत पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सहायक निरीक्षक समीर करपे करत आहेत.
...पूर्वीचे वाद अन् गुन्हेगारी रेकॉर्ड
आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहण्यास असून, त्यांच्यात पूर्वीचे वाद होते. यातील जखमी झालेला तरुण रेकॉर्डवरील आहे, तर आरोपीतील दोघांवर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल आहेत.
Web Summary : Pune: A teen gang shot and injured a 17-year-old over an old feud in Wadgaon Budruk. Police arrested five minors. The victim was attacked with weapons and a bullet, while another narrowly escaped injury. Previous disputes and criminal records are involved.
Web Summary : पुणे: वडगांव बुद्रुक में पुराने झगड़े को लेकर किशोर गिरोह ने 17 वर्षीय युवक को गोली मार दी, जिससे वह घायल हो गया। पुलिस ने पांच नाबालिगों को गिरफ्तार किया। पीड़ित पर हथियारों और गोली से हमला किया गया, जबकि दूसरा बाल-बाल बच गया। पूर्व विवाद और आपराधिक रिकॉर्ड शामिल हैं।